एका 17 वर्षाच्या मुलाला ट्रम्प यांची हत्या करून सरकार उलथवायचं होतं, मायबापालाही मारलं; कोण आहे निकिता?
विस्कॉन्सिनमधील 17 वर्षीय निकिता कैसाप याने अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करण्याचे षड्यंत्र रचल्याचा आरोप आहे. याच षड्यंत्राचा भाग म्हणून त्याने आपल्या पालकांचीही हत्या केल्याचं उघड झालं आहे. पोलिसांना त्याच्याकडून नव-नाझी विचारसरणीशी संबंधित साहित्य सापडले आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणूक प्रचारावेळी दोनदा जीवघेणा हल्ला झाला. पण या हल्ल्यातून ते सुदैवाने बचावले. असं असलं तरी त्यांच्यावरील धोका काही टळलेला नाही. राष्ट्रपती बनल्यानंतरही ट्रम्प यांना मारण्याचा प्लान झाला होता. संघीय वॉरंटमध्ये हा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यातील 17 वर्षाच्या निकिता कैसापवर राष्ट्रपती ट्रम्प यांच्या हत्येचा आणि त्यांचं सरकार उलथवून लावण्याचा आरोप करण्यात आला आहे. याच हेतूने त्याने आधी आपल्या आईवडिलांचीही हत्या केल्याचं या वॉरंटमध्ये म्हटलं आहे.
या धक्कादायक खुलाश्यानंतर अमेरिकेत खळबळ उडाली आहे. एक 17 वर्षाचा मुलगा जगातील सर्वात शक्तीशाली राष्ट्रपतीची हत्या करण्याची योजना कशी आखत होता? असा सवाल विचारला जात आहे. राष्ट्रपतीची हत्या करण्याच्या विचाराने त्याला एवढं पछाडलं होतं की त्याने त्याची आई आणि सावत्र बापाचीही हत्या केल्याचं समोर आल्याने अमेरिकेत चर्चांना उधाण आलं आहे. अनेक नागरिकांचा तर ही बातमी वाचून थरकाप उडाला आहे.
AP रिपोर्टनुसार, निकिता कैसापवर गेल्या महिन्यात वॉकेश काउंटीच्या अधिकाऱ्यांनी आरोप ठेवले होते. निकिताने त्याची आई तातियाना कैसाप आणि सावत्र वडील डोनाल्ड मेयर यांची हत्या करणे, चोरी करणे आणि इतर गंभीर गुन्ह्याचे त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले होते. निकिताकडे अशा काही गोष्टी सापडल्या आहेत की त्यावरून तो नाझी समर्थक असल्याचं स्पष्ट होत आहे. त्याला अमेरिकेत मोठा बदल घडवून आणायचा होता, हे सुद्धा यावरून स्पष्ट होताना दिसत आहे.
सडलेल्या आवस्थेत मृतदेह
28 फेब्रुवारी रोजी पोलिसांना तातियाना आणि मेयरचा मृतदेह सापडला. मेयर कामावर गेले नसल्याचं आणि निकिताही दोन आठवड्यापासून शाळेत गेला नसल्याचं कळल्यावर या खुनाची माहिती समोर आली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. पोलिसांच्या मते 11 फेब्रुवारी रोजीच दोघांची हत्या करण्यात आली होती. या दोघांचे मृतदेह इतके सडले होते की त्यांची ओळख पटवणे कठिण झाले होते. त्यांच्या दातांच्या सँपलवरून त्यांची ओळख पटवली गेल्याचं प्रॉसिक्युटरने कोर्टात कथितपणे सांगितलं होतं.
Nikita Casap, 17, from Waukesha Wisconsin was arrested after murdering both his parents and fleeing with their car and money as part of an accelerationist conspiracy to assassinate President Trump.
Casap was directly linked to individuals who I have identified as being Order of… pic.twitter.com/cHr3YkMprL
— Bx (@bx_on_x) April 13, 2025
तो असं का करतोय?
ऑनलाइन कोर्ट रेकॉर्डनुसार, निकिता कैसापवर एकूण 9 गंभीर आरोप आहेत. यात हत्येच्या दोन केसेस आणि मृतदेह लपवण्याच्या दोन केसेस आहेत. आईवडिलांची हत्या केल्यानंतर तो अनेक आठवडे सडलेल्या मृतदेहांसोबत राहत होता. त्यानंतर 14 हजार रोख अमेरिकन डॉलर, पासपोर्ट आणि घरातील कुत्र्याला घेऊन तो पळाला होता.
पोलिसांना निकिताकडे द ऑर्डर ऑफ नाइन एंजल्सशी संबंधित साहित्य मिळालं आहे. नव-नाझी वंशाशी प्रेरित कट्टरपंथी विचारधारेच्या लोकांचं हे एक नेटवर्क आहे. CNNचे सहकारी WISN कडून दाखल करण्यात आलेल्या अर्जात अनेक माहिती देण्यात आली आहे. कैसापने लिखित दस्ताऐवज आणि टेक्स्ट संदेश पाठवले होते. त्यात ट्रम्प यांची हत्या आणि अमेरिकन सरकार उलथवून लावण्याचं आव्हान करण्यात आलं होतं. हिंसक क्रांतीची योजना आखण्याबद्दल कैसाप बोलत असल्याचंही या अर्जात म्हटलं आहे.
7 मे रोजी शिक्षा?
निकिता कैसापला 9 एप्रिल रोजी पहिल्या सुनावणीसाठी कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर 1 मिलियन अमेरिकन डॉलर (सुमारे 8.6 कोटी रुपये)च्या बाँडवर त्याला अटक करण्यता आली. त्याला 7 मे रोजी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्याच दिवशी त्याच्यावरील आरोप वाचले जाऊन त्याला शिक्षा ठोठावली जाऊ शकते, असं सांगितलं जातं.