World News | कोरोना रिपोर्टमध्ये फेरफार करणारा डॉक्टर बांग्लादेशात ताब्यात, पैशांच्या लालसेपोटी डॉक्टरचं संतापजनक कृत्य
जगभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडल्याचे पाहायला मिळत आहे (World Corona Virus Update)
मुंबई : कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगातील अनेक देश वेगवगळ्या उपाययोजना करत आहेत (World Corona Virus Update). जगभरातील शेकडो वैज्ञानिक कोरोनाची लस तयार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. भारतातही कोरोना लसीवर मोठं काम सुरु आहे. दरम्यान, कोरोनामुळे जगात अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर जगभरात घडत असलेल्या (World Corona Virus Update) घडामोडींचा एक आढावा
1. कोरोना रिपोर्टमध्ये फेरफार करणारा डॉक्टर बांग्लादेशात ताब्यात घेतला गेलाय. धक्कादायक म्हणजे वेश बदलून हा डॉक्टर भारतात शिरण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्याआधीच बांग्लादेशच्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. या डॉक्टरच्या दवाखान्यात आतापर्यंत 10 हजारांहून जास्त लोकांच्या चाचण्या झाल्या होत्या. त्यापैकी 4 हजार लोकांचे रिपोर्ट खरे होते. तर बाकीचे 6 हजार लोक निगेटिव्ह असूनही त्यांना कोरोना पॉझिटिव्हचे रिपोर्ट दिले गेले. पैशांच्या लालसेपोटी डॉक्टरनं हे कृत्य केल्याची माहिती आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
2. कोरोना हा फक्त साधा फ्ल्यू आहे, असं म्हणणाऱ्या ब्राझिलच्या राष्ट्रपतींनाही कोरोना झाला आहे. काल त्यांची दुसरी टेस्ट घेतली गेली. ती सुद्धा पॉझिटिव्ह निघाल्यानं ते सध्या क्वारंटाईन झाले आहेत. महत्वाचं म्हणजे काही महिन्यांपूर्वी हेचॉ राष्ट्रपती क्वारंटाईन आणि लॉकडाऊनच्या नियमांना विरोध करत होते.
3. कोरोनाच्या लसीसंदर्भात लवकरच मोठी बातमी येणार असल्याचं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. काल संध्याकाळी ट्विटरवरुन त्यांनी great news on vaccine असं ट्विट केलं. अमेरिकेची मॉर्डना कंपनी 27 जुलैला तिसऱ्या टप्प्याची चाचणी करणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं हे ट्विट हे त्याच चाचणीशी जोडून बघितलं जात आहे.
हेही वाचा : कोरोना लसीची मानवी चाचणी यशस्वी, रशियाचा दावा
4. सर्वाधिक चाचण्या करणाऱ्या देशांच्या यादीत भारत जगात तिसरा आहे. भारतात आतापर्यंत 1 कोटी 24 लाख चाचण्या झाल्या आहेत. जगात सर्वाधिक चाचण्या घेण्यात अमेरिका आघाडीवर आहे. तिथं आतापर्यंत चार कोटी 48 लाख लोक तपासले गेले आहेत. त्यानंतर रशियामध्ये 2 कोटी 40 लाख लोकांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.
5. कोरोनाच्या जागतिक आकडेवारीत पाकिस्तान जगात 12 व्या स्थानावर आहे. पाकिस्तानातल्या कोरोनाबाधितांची संख्या सध्या 2 लाख 57 हजारांच्या घरात आहे. मात्र पहिल्या 12 देशांमध्ये मेक्सिको देश सोडला तर सर्वात कमी चाचण्या पाकिस्तानातच झाल्या आहेत.
6. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॅनडा आणि मेक्सिको या दोन्ही देशांनी अमेरिकेशी लागून असलेल्या सीमा सील केल्या आहेत. कोणत्याही मोठ्या कारणाशिवाय आता अमेरिकन लोकांना कॅनडा किंवा मेक्सिकोला जाता येणार नाही.
7. हाँगकाँगमध्ये कोरोनाची तिसरी लाट सुरु झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात सुरु केलेलं डिझनी लँड पुन्हा एकदा बंद करण्यात आलं आहे. महिन्याभरापूर्वीच डिझनी लँड सुरु करण्यात आलं होतं. मात्र आता पुन्हा त्याला कुलुप लावलं गेलं.
8. तब्बल 6 महिन्यानंतर चीनमधले सिनेमागृहं सुरु होणार आहेत. ‘ग्लोबल टाईम्स’च्या बातमीनुसार ज्याभागात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी आहे, त्या भागात 20 जुलैपासून सिनेमागृहांना उघडण्याची परवानगी देण्यातआली आहे. बिजिंगचे काही सिनेमागृहं सोडली तर जानेवारीपासून चीनमधले सर्व सिनेमागृहं बंद होती. जगात सर्वाधिक सिनेमागृह असणाऱ्या देशांमध्ये चीन पहिल्या स्थानी तर भारत दुसऱ्या स्थानी आहे.
9. जागतिक लोकसंख्या वाढीच्या अंदाजाबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. 2100 सालापर्यंत जगाची एकूण लोकसंख्या 880 कोटी असेल, असा नवा अंदाज वर्तवला गेला आहे. याआधी संयुक्त राष्ट्रानं हाच आकडा 1090 कोटी इतक सांगितला होता. मात्र युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिग्ंटनच्या अंदाजानुसार त्यात 200 कोटींची घट दाखवली गेली. सध्या जगाची एकूण लोकसंख्या ही 780 कोटी आहे. विशेष म्हणजे जपान, स्पेन, इटली, थाईलँड, पोर्तुगाल या देशांमधली लोकसंख्या ही आत्ताच्या लोकसंख्येच्या तुलनेनं निम्म्यानं कमी होण्याचाही अंदाज आहे.
10. भारताच्या लोकसंख्यावाढीबाबत मात्र कोणताही मोठा बदल या अंदाजात वर्तवण्यात आलेला नाही. कोणतीही मोठी वाढ किंवा मोठी घट होण्याची चिन्हं नाहीत. मात्र जीडीपीच्या क्रमवारीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश होण्याचा अंदाज आहे.