हे गाणं गाताच थेट जीवच जातो, आतापर्यंत 12 लोक दगावले; जगातील सर्वात खतरनाक गाणं
गाण्यामुळे प्रत्येकाला प्रसन्न वाटतं. गाणं ऐकणं ही एक पर्वणी असते. त्यामुळे लोक महागडी तिकीटं काढून गाण्याच्या मैफली ऐकायला जातात. गाण्याचे लाइव्ह कॉन्सर्टही होत असतात. पण जर एखादं गाणच जीवावर उठत असेल तर....
वॉशिंग्टन | 8 सप्टेंबर 2023 : गाण्यामुळे मूड फ्रेश होतो. मन प्रसन्न होतं. आयुष्याला एक वेगळं वळण लागतो. गाणं ऐकण्यासारखा दुसरा आनंद नसतो. कारण गाणं ऐकता ऐकता माणूस इतका तल्लिन होतो की त्याची ब्रह्मानंदी टाळी लागते. अलिकडे तर आजारी माणसांनाही गाणं ऐकवून त्याचं मनोबल वाढवलं जातं. अहो माणसंच काय प्राणी सुद्धा गाणं आणि संगीत ऐकताना तल्लीन होताना अनेकदा पाहण्यात आलं आहे. अबालवृद्ध असो की आणखी कोणी गाण्याच्या ठेक्यावर अनेकजण ताल धरत असतो. थोडक्यात काय तर गाण्याला जीवन संजीवनी म्हणूनही पाहिलं जातं. पण हेच गाणं जीवावर उठलं तर…? काय वाटलं ना आश्चर्य. पण हे खरं आहे.
एखाद्या गाण्याने लोकांचा मृत्यू ओढवत असेल असं म्हटलं तर तुम्हाला धक्का बसेल. पण ते खरं आहे. फिलिपाईन्सचं एक गाणं आहे. हे गाणं जगातील सर्वात खतरनाक गाणं मानलं जातं. जी व्यक्ती हे गाणं ऐकते त्याची हत्या होते, असं सांगितलं जातंय. आतापर्यंत हे गाणं ऐकल्याने 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हे गाणं जगातील सर्वात खतरनाक गाणं मानलं जात आहे.
किलिंग साँग
डेली स्टारने एक वृत्त दिलं आहे. त्यानुसार एक गाणं जगातील सर्वात खतरनाक गाणं म्हटलं गेलं आहे. अमेरिकेची गायिका फ्रँक सिनात्रा (Frank Sinatra) हिने हे गाणं गायलं आहे. आपलं हे गाणं इतकं खतरनाक असेल असं त्यांनाही कधी वाटलं नसेल. पण आता हेच गाणं खतरनाक ठरताना दिसत आहे. माय वे असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्याला फिलिपाईन्सचं किलिंग साँग म्हणून ओळखलं जातं. एका दाव्यानुसार एखादा गायक हे गाणं स्टेजवर लाइव्ह गाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची हत्या होते. या गाण्यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
गाण्यावर बंदी नाहीच
दरम्यान, एवढ्या हत्या झाल्यानंतरही फिलिपाईन्सने या गाण्यावर बंदी घातलेली नाही. मात्र, या गाण्याची दहशत एवढी आहे की लोक हे गाणं गुणगुणत नाही. फिलिपाईन्समधील अनेक कराओके बारमध्ये या जीवघेण्या गाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 90च्या दशकात हे गाणं गायल्यानंतर त्या गायकाची हत्या होत असायची असं सांगितलं जात आहे.
कारण काय?
एका पॉडकास्टरने या गाण्यामुळे हत्या का होते याची माहिती दिली. या पॉडकास्टरच्या मते हे गाणं हिंसा घडवून आणण्यास प्रवृत्त करत असतं. त्यामुळे राडा होतो. ज्या बारमध्ये गायक हे गाणं गायचा त्या बारमध्ये शस्त्र लोक यायचे. ते नशेत असायचे. दारुची नशा आणि गाण्यातून हिंसेला प्रवृत्त केलं जाणं यामुळे हे नशेत असलेले लोक मारामाऱ्या करायचे. त्यामुळे कुणाचा ना कुणाचा मृत्यू व्हायचा. या गाण्याच्या बाबतीतच असं घडायचं. त्यामुळे हे गाणं अत्यंत खतरनाक मानलं जातं, असं पॉडकास्टरचं म्हणणं आहे.