AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या भाजप नेत्यांच्या पोस्टवर कारवाई नाही’, WSJ च्या अहवालात Facebook वर गंभीर आरोप

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर प्रसिद्ध अमेरिकन वृत्तपत्र  'द वॉल स्ट्रीट जर्नल'च्या एका अहवालात गंभीर आरोप करण्यात आले आहेत (WSJ Report on Facebook and BJP).

'हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या भाजप नेत्यांच्या पोस्टवर कारवाई नाही', WSJ च्या अहवालात Facebook वर गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Aug 16, 2020 | 2:44 PM

नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर प्रसिद्ध अमेरिकन वृत्तपत्र  ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या एका अहवालात गंभीर आरोप करण्यात आले आहेत (WSJ Report on Facebook and BJP). फेसबुकने भाजप नेत्यांच्या द्वेषपूर्ण आणि हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्टवर कारवाई केली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी फेसबुक इंडियाच्या धोरण विभाग प्रमुख अनखी दास यांना जबाबदार धरण्यात आलं आहे.

भाजप नेत्यांच्या या द्वेषपूर्ण पोस्टबाबत कारवाईला अंकी दास यांनीच विरोध केल्याचा आरोप फेसबुकच्या काही कर्मचाऱ्यांनी केल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे भारतात या प्रकरणावरुन विरोधी पक्षांनी फेसबुक आणि भाजपला फैलावर घेतलं आहे. फेसबुकने द्वेषपूर्ण भाषण आणि पोस्टसाठी तयार करण्यात आलेल्या नियमांना फाटा देऊन भाजप नेत्यांच्या पोस्टवर कारवाई करणे टाळले. ही कारवाई करण्याला फेसबुक इंडियाच्या एका उच्च पदाधिकाऱ्यानेच विरोध केल्याचंही वॉल स्ट्रीट जर्नलच्या या अहवालात म्हटलं आहे.

हेही वाचा : फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा दंड

संबंधित फेसबुक पदाधिकाऱ्याने व्यवसायाचं कारण सांगत भाजपशी संबंधित जवळपास 4 लोकांसह काही ग्रुपवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली. फेसबुक इंडियाच्या पब्लिक डायरेक्टर अनखी दास यांनी भाजप नेत्यावरील कारवाईमुळे भारतातील फेसबुकच्या बिझनेसला नुकसान होईल, असं सांगितलं होतं, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

हेही वाचा : एकट्या भाजपकडून सोशल मीडियावरील जाहिरातींवर 25 कोटींचा खर्च, इतर पक्षांकडून किती?

भारत फेसबुकचं सर्वात मोठं मार्केट

युजर्सच्या संख्येचा विचार करता भारत फेसबुकसाठी सर्वात मोठं मार्केट आहे. भारतात फेसबुकचे सर्वाधिक 346 मिलियन युजर्स आहेत. त्यामुळेच फेसबुकने भाजप नेत्याच्या द्वेषपूर्ण पोस्टवर कारवाई करणं टाळलं, असा आरोप होत आहे. अनखी दास यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यावरील कारवाई टाळून पक्षपातीपणा केल्याचंही अहवालात म्हटलं आहे.

या अहवालात भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांचं नाव आहे. त्यांनी अल्पसंख्यांकांविरोधात हिंसेला प्रोत्साहन देणारी पोस्ट केल्याचा आरोप आहे. त्यांच्या काही पोस्टवर फेसबुकच्या काही कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला आणि त्यावर बंदी घालण्याबाबत हालाचाली केल्या. मात्र, अनखा दास यांनी यात हस्तक्षेप करत ही कारवाई करण्यास मनाई केली.

दरम्यान या अहवालाचे भारतात जोरदार पडसाद पडले आहेत. सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी या प्रकरणी ट्वीटची मालिका पोस्ट करत अनेक आक्षेप नोंदवले आहेत. अनखी दास यांचा भाजपशी जवळचा संबंध आहे. त्यामुळेच हितसंबंधाचा संघर्ष होऊन त्यांनी भाजपवर कारवाई करण्याचं टाळल्याचा आरोप गोखले यांनी केला आहे.

काँग्रेसचे नेते आणि संसदेच्या माहिती आणि तंत्रज्ञान समितीचे प्रमुख शशी थरुर यांनी देखील या प्रकरणी  चौकशी करणार असल्याचे संकेत दिले आहे. तृणमुल काँग्रेसच्या खासदार मोहुआ मोईत्रा यांनी देखील या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “निवडणुकीत फेसबुकने कसं काम केलं हे मी पाहिलं आहे. ते सर्वाधिक खोट्या गोष्टींचं वाहक आहे. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्याला आणि तार्किक चर्चांना धोका आहे. संसदेने या प्रकरणी चौकशी सुरु करावी.”

विशेष म्हणजे अमेरिकेत फेसबुकवर अशाच प्रकारचे अनेक आरोप झाले आहेत. त्यानंतर तेथील संसदेने फेसबुकच्या चौकशीसाठी विशेष समिती तयार करुन तपास करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनाही त्या समितीसमोर हजर राहण्याची नामुष्की आली. आता या नव्या आरोपांनंतर भारतीय संसदेत काय निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

Apple, Amazon, Facebook, Google च्या प्रमुखांवर गंभीर आरोप, अमेरिकेच्या संसदेत सर्वांची झाडाझडती

भारतीय लष्कराचा मोठा निर्णय, जवानांना Facebook, Tik Tok सह 89 अ‍ॅप डिलीट करण्याचे आदेश : सूत्र

पुन्हा फेसबुकच्या 26 कोटी युजर्सचा डेटा लीक

संबंधित व्हिडीओ :

WSJ Report on Facebook and BJP