कोरोना चाचणीबद्दल तुमच्याही मनात आहेत प्रश्न? या बातमीतून होतील सर्व शंका दूर
कोरोना चाचणीसाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट व आरटीपीसीआर अशा दोन महत्वाच्या चाचण्या आहेत. यातील अँटीजेन टेस्टचा निकाल लवकर तर आरटीपीसीआरला तुलनेत जास्त वेळ लागत असतो. परंतु दोघांमध्ये आरटीपीसीआर टेस्ट ही सर्वाधिक विश्वासार्ह असल्याचा दावा तज्ज्ञांकडून करण्यात येतो. अँटीजेन चाचणीचा निकाल काही अंशी चुकू शकतो, याबाबत नवभारत टाइम्स यात सविस्तर वृत्त प्रसिध्द झाले आहे.
मुंबई : कोरोना संसर्गाला सुरुवात झाली त्यावेळी सर्वत्र कमालीची साशंकतेचे वातावरण होते. कोरोनाच्या चाचणीपासून ते उपचारापर्यंत सर्वत्र संभ्रम होता. त्यानंतर संसर्ग झालाय की नाही यासाठी अँटीजेन (Antigen) व आरटीपीसीआर (RTPCR) या चाचण्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत होता. सुरुवातीला तर या चाचण्यांसाठी (Test) लागणारी सर्व साहित्य हे पूर्णत: बाहेरील देशांमधून आयात करावी लागत होती. परंतु कालांतराने अँटीजेन चाचणीचे किट हे सरकारकडून सर्वत्र उपलब्ध करुन घरीच चाचणी करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
आता बाजारात अनेक टेस्टिंग किट उपलब्ध आहेत, ज्याद्वारे आपण घरबसल्या कोरोना चाचणी करू शकता आणि त्याचा निकालही लगेच जाणून घेऊ शकता. या किटच्या माध्यमातून तुम्हाला कोविडचा धोका आहे की नाही, हे लगेच कळू शकते. सध्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमध्ये चाचणी किटच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे, या चाचणी किटद्वारे, लोकांना संसर्ग झाला आहे की नाही हे सहज पाहता येईल. हे घरगुती वापराचे किट ओमिक्रॉनला शोधू शकते, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. याच प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न नवभारत टाईम्स या माध्यमाच्या संकेतस्थळावर एका लेखाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
अँटीजेन की आरटीपीसीआर योग्य?
रॅपिड अँटीजेन व आरटीपीसीआर या दोन्ही चाचण्यांच्या माध्यमातून कोरोना संसर्ग शोधला जातो. परंतु तुलनेत आरटीपीसीआर चाचणीचा निकाल येण्यास काहीसा विलंब होत असतो. तर दुसरीकडे अँटीजेन चाचणीचा निकाल अवघ्या काही मिनीटांमध्ये आपण पाहू शकतो. अँटीजेन चाचणीच्या माध्यमातून व्यक्ती हा कोरोनाबाधित आहे की नाही याची माहिती मिळते. तर आरटीपीसीआर चाचणीव्दारे त्याला कोरोनाचा कुठला व्हेरिएंट हे अतिशय अचूक पध्दतीने समजत असते. या दोन्ही चाचण्या एकाच पद्धतीने केल्या जातात. या चाचण्यांमध्ये नाक आणि घशातून, लाळेद्वारे त्या व्यक्तीला संसर्ग झाला आहे की नाही हे शोधले जाते.
घरगुती चाचणी किती विश्वसनीय?
तज्ज्ञांच्या मते, घरगुती चाचणीद्वारे, कोविड चाचणीचा निकाल फक्त लवकरच मिळत नाही. तर ती आतापर्यंतची एक विश्वसनीय चाचणी असल्याचे सिद्ध झाले आहे. आरटीपीसीआर चाचणीच्या तुलनेत तीचा निकाल किंचित चुकीचे असू शकतो. परंतु याला पूर्णपणे निरुपयोगी म्हणता येणार नाही घरी कोविड चाचणी करण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. आरटीपीसीआर चाचणीबद्दल बोलायचे झाले तर त्याचे निकाल यायला वेळ लागतो. कारण या चाचणीमध्ये नमुना अनेक महागड्या आणि निदान प्रक्रियेतून जात असतात.
पॉझिटीव्ह, निगेटीव्ह किती अचूक
कोरोनासाठी घरी केली जाणारी अँटीजेन चाचणी स्वस्त आहे व झटपट होते. पण ते 100 टक्के अचूक आहे की नाही हे सांगता येत नाही. म्हणजेच अँटीजेन चाचणीद्वारे चुकीचे निकालही येऊ शकतात. अँटीजेन चाचणी केवळ प्रथिनांचा भाग पाहते ती विषाणूचा संपूर्ण आरएनए शोधत नाही. म्हणून, कोरोना झालाय की नाही यासाठी तुम्ही आरटीपीसीआर चाचणी करून घेणे महत्त्वाचे आहे.
अँटीजेनव्दारे ओमिक्रॉन शोधता येतो ?
ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमध्ये अँटिजेन रॅपिड टेस्ट किटची मागणी वाढली आहे. या चाचणीमुळे हा नवा व्हेरिएंट शोधला जातो की नाही, याची माहिती अद्याप उपलब्ध नाही. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने नुकतेच सांगितले आहे की, अँटीजेन चाचणीद्वारे कोरोना विषाणूचा शोध लावला जाऊ शकतो. अल्फा, डेल्टा, बीटा किंवा ओमिक्रॉनने संक्रमित व्यक्तीला कोणत्या प्रकाराचा संसर्ग झाला आहे हे महत्त्वाचे नाही. दरम्यान, पब्लिक हेल्थ एजन्सीनेदेखील ओमिक्रॉनच्या बाबतीत काही शंका निर्माण केल्या आहेत. यूएस संसर्गजन्य रोग तज्ज्ञ अँथनी फौसी म्हणतात की, घरच्या घरी कोविड चाचणीद्वारे ओमिक्रॉन शोधणे थोडे कठीण आहे. एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी चाचणी ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. त्याला कुठल्या व्हेरिएंटची लागण झाली आहे हे समजत नसले तरी संसर्ग झाल्याबद्दल त्यातून नक्कीच समजते. आरटीपीसीआर चाचणी सर्वात अचूक मानली जाते. सर्वात अचूक निदान करणारी आरटीपीसीआर चाचणी ही एकमेव आहे..
अनेक कंपन्याना किटसाठी मंजुरी
कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि आयसीएमआरचे डीजी डॉ. बलराम यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना घरी कोविड चाचणीला प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे. त्यांच्या मते आरटीपीसीआर चाचणीला वेळ लागू शकतो. त्यामुळे चाचणीसाठी घरगुती चाचणीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने MyLab Discovery Solutions, Panbio COVID-29 antigen self-test by Abbott, Angstrom’s Angcard Covid 19 Antigen Rapid Test Kit यासह भारतातील अनेक कंपन्यांच्या चाचणी किटला मान्यता दिली आहे.
अशी लक्षणे दिसताच चाचणी करा
सध्याच्या परिस्थितीत कोरोना कोणालाही आणि कधीही होऊ शकतो. अशा परिस्थितीत ताप, खोकला, घसा खवखवणे, वास, थकवा यासारखी लक्षणे दिसल्यास ताबडतोब कोविड चाचणी करून घ्या. तुम्ही कोरोना लस घेतली घेतली असेल किंवा नसेल तरीही कोरोना नियमांचे पालन करणे व त्याचा प्रसार रोखणे आवश्यक आहे.
(टीप : सदर लेख उपलब्ध माहितीवर आधारीत आहे, यास कुठल्याही प्रकारचा सल्ला समजू नये, अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)
इतर बातम्या :
Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित कोरोना पॉझिटिव्ह
Startup India: 16 जानेवारी हा दिवस ‘नेशनल स्टार्ट-अप डे’ म्हणून साजरा करणार; पंतप्रधान मोदींची घोषणा