SpaDeX मोहीम ‘या’ तारखेला पूर्ण होणार, ‘इस्रो’ने दिले अपडेट
SpaDeX मोहिमेसंदर्भात इस्रोने मोठे अपडेट दिले आहे. 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत ISRO ने लिहिले की, 7 जानेवारीला होणारी स्पेस डॉकिंग सिस्टीम 9 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. ही मोहीम अंतराळात डॉकिंग तंत्राचे प्रात्यक्षिक दाखवणार आहे.
आज आम्ही तुम्हाला एका खास मोहिमेची माहिती देणार आहोत. आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आपल्या महत्त्वाकांक्षी SpaDeX (स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट) मोहिमेअंतर्गत 7 जानेवारी रोजी होणारा डॉकिंग प्रयोग पुढे ढकलला आहे. आता 9 जानेवारीला हा प्रयोग केला जाणार आहे.
ISRO ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली. भारताच्या भविष्यातील अंतराळ प्रकल्पांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अंतराळात डॉकिंग तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करणे हा या प्रयोगाचा उद्देश आहे.
30 डिसेंबर रोजी ISRO ने SpaDeX मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले. पीएसएलव्ही-सी 60 रॉकेटच्या माध्यमातून एसडीएक्स 01 (चेसर) आणि एसडीएक्स 02 (टार्गेट) नावाचे दोन छोटे उपग्रह 475 किलोमीटरच्या कक्षेत स्थापित करण्यात आले. 220 किलो वजनाचे हे दोन्ही उपग्रह डॉकिंग तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी खास डिझाइन करण्यात आले आहेत. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दोन वेगवेगळे अंतराळयान जोडण्याची प्रक्रिया दाखविण्यात येणार आहे.
स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान का महत्त्वाचे?
भारताच्या अंतराळ महत्त्वाकांक्षेसाठी स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. ISRO च्या म्हणण्यानुसार, हे तंत्रज्ञान भारताला स्वतःचे अंतराळ स्थानक तयार करणे आणि चंद्रावरील नमुने परत आणणे यासारखे प्रकल्प साकार करण्यास मदत करेल.
या तंत्रज्ञानामुळे अंतराळयानांमध्ये साहित्य, उपकरणे आणि माणसांचे हस्तांतरण शक्य होणार आहे. अंतराळ स्थानकाच्या संचालनासाठीही हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे.
डॉकिंग सिस्टीम का आवश्यक आहे?
डॉकिंग तंत्रज्ञान म्हणजे अंतराळात दोन वाहने जोडण्याची प्रक्रिया. या तंत्रज्ञानामुळे अंतराळात आपोआप वाहने जोडली जाऊ शकतात. याद्वारे मानव किंवा साहित्य एका अंतराळयानातून दुसऱ्या अंतराळयानात हस्तांतरित केले जाऊ शकते. अंतराळात भारताच्या नव्या यशाचा मार्ग मोकळा करणारी ही परवडणारी तंत्रज्ञान प्रात्यक्षिक मोहीम असल्याचे इस्रोने म्हटले आहे.
भारताची ताकद वाढेल?
ISRO च्या SpaDeX मोहिमेमुळे अंतराळात भारताची ताकद आणखी बळकट होणार आहे. हे तंत्रज्ञान भारताचे चांद्रयान-४, अंतराळ स्थानक उभारणी आणि चंद्रावरील मानवी मोहिमेसारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांची पायाभरणी करेल. डॉकिंग तंत्रज्ञानाच्या यशस्वी प्रात्यक्षिकामुळे भारत आपल्या अंतराळ प्रकल्पांना नव्या उंचीवर नेऊ शकणार आहे. या मोहिमेचे महत्त्व लक्षात घेता भविष्यातील अंतराळ योजनांचा हा महत्त्वाचा भाग असल्याचे इस्रोने म्हटले आहे.
महत्त्वाची तारीख लक्षात ठेवा
एक लक्षात ठेवा की, SpaDeX 7 जानेवारी रोजी होणारा डॉकिंग प्रयोग आता 9 जानेवारीला, आज केला जाणार आहे.