ITR : जुनी कर प्रमाली की नवीन कर प्रणाली? कशी निवडाल जाणून घ्या
अर्थसंकल्प सादर झाला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी जुन्या करप्रणालीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पण नवीन कर प्रणालीमध्ये बदल करण्यात आला आहे. तुम्हाला ही जर प्रश्न पडला असेल की कोणत्या पद्धतीने आयकर भरावा तर जाणून घ्या. कोणती प्रणाली तुमच्यासाठी योग्य आहे.
ITR Filling : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्प (Budget) सादर केला. या अर्थसंकल्पात करात अनेक बदल करण्यात आले आहेत. आयकरातही मोठे बदल करण्यात आले आहेत. पण हे सर्व बदल नवीन कर प्रणालीमध्ये झाले आहेत. जुन्या कर प्रणालीमध्ये कोणतेही बदल केले गेलेले नाहीत. आता जुन्या कर प्रणालीमध्ये 4 लाख 83 हजार 333 रुपयांपेक्षा जास्त वजावट झालेल्या लोकांनाच लाभ मिळणार आहे. ३१ जुलैच्या आत आयटीआर दाखल करायचा आहे. पण त्याआधी तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मी कोणत्या कर प्रणालीनुसार आयटीआर भरु. तर आम्ही तुम्हाला याचे उत्तर देणार आहोत.
टॅक्स स्लॅब
अर्थमंत्र्यांनी नवीन कर प्रणालीमध्ये 2024-25 या आर्थिक वर्षासाठी नवीन आयकर स्लॅब जाहीर केले आहेत. यामध्ये पहिला स्लॅब 3 लाख रुपयांवर स्थिर ठेवण्यात आला आहे, मात्र 3 ते 6 लाख रुपयांचा स्लॅब आणि 6 ते 9 लाख रुपयांचा स्लॅब हा अनुक्रमे 3 ला७ख ते 7 लाख आणि 7 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे 9 लाख ते 12 लाख रुपयांचा स्लॅब बदलून 10 लाख-12 लाख रुपये करण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त, नवीन कर प्रणालीमध्ये मानक वजावट रुपये 50,000 वरून 75,000 रुपये करण्यात आली आहे. जुन्या पद्धतीमध्ये मानक वजावट रुपये 50,000 वर स्थिर आहे. जुन्या आयकर प्रणालीमध्ये कोणतेही बदल जाहीर करण्यात आले नाहीत कारण सरकारला नवीन प्रणालीला प्रोत्साहन द्यायचे आहे.
अजूनही तुम्ही जुन्या कर प्रणालीमध्ये राहण्याचा विचार करत असल्यास तुम्हाला वार्षिक ४.८३ लाख रुपयांपेक्षा जास्त कपात करावी लागेल, असे फिनटेक कंपनी Bankbazaar.com चे CEO आदिल शेट्टी म्हणतात. तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व वजावट एकत्र करून ही वजावट मिळू शकते.
उदाहरणार्थ तुम्ही गृहकर्जाच्या व्याज पेमेंटवर कलम 24B अंतर्गत ₹ 2 लाखांपर्यंतची वजावट मिळवू शकता. याशिवाय जीवन विमा प्रीमियम, गृहकर्जाची मुद्दल रक्कम, PPF, EPF इत्यादींसाठी 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट उपलब्ध आहे. तुम्ही आरोग्य विमा प्रीमियम आणि प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीसाठी 80D मध्ये ₹1 लाखांपर्यंत वजावट घेऊ शकता. 80CCD अंतर्गत, NPS साठी 50 हजार रुपयांची वजावट मिळू शकते. भाड्याच्या पेमेंटसाठी HRA आणि 80G-पात्र धर्मादाय संस्थांना देणग्या देखील करमुक्त आहेत.
या सर्व वजावट जोडून तुम्ही एकूण ₹4.83 लाखांपेक्षा जास्त वजावट करू शकत असाल, तर तुमच्यासाठी जुन्या प्रणालीमध्ये राहणे चांगले आहे. जर तुम्ही या संख्येपर्यंत पोहोचू शकत नसाल, तर नवीन व्यवस्था तुमच्यासाठी चांगली आहे जिथे कमी कर दर, अधिक मानक वजावट आणि कर स्लॅबमध्ये वाढ प्रदान केली जात आहे.