16 वर्षांखालील मुलांठी मेटाचा नवा मोठा नियम ! “या” अटीशिवाय अकाऊंट वापरता येणार नाही!
मेटा प्लॅटफॉर्म्सने त्यांच्या ‘टीन अकाउंट्स’ या फीचरचा विस्तार आता फेसबुक आणि मॅसेंजरवर केला आहे. पण हा निर्णय अचानक का घेतला गेला?

सोशल मीडियावर मुलांच्या सुरक्षिततेच्या दिशेने मेटा प्लॅटफॉर्म्सने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. मेटाने त्यांच्या ‘टीन अकाउंट्स’ नावाच्या विशेष फीचरचा विस्तार आता फेसबुक आणि मॅसेंजरवरही केला आहे. सुरुवातीला हे फीचर फक्त इन्स्टाग्रामवर लागू करण्यात आलं होतं. मात्र आता फेसबुक आणि मॅसेंजरसारख्या मुख्य प्लॅटफॉर्म्सवरही किशोरवयीन युजर्ससाठी हे सुरक्षात्मक उपाय राबवले जातील.
या नव्या फीचरमुळे पालकांना आपल्या मुलांच्या ऑनलाइन वर्तनावर लक्ष ठेवता येणार आहे. गोपनीयता (प्रायव्हसी) सेटिंग्ज अधिक मजबूत करण्यात आल्या आहेत आणि मुलांना काही विशिष्ट गोष्टी करायच्या असतील तर पालकांची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, १६ वर्षांखालील युजर्सना फेसबुकवर ‘लाइव्ह’ व्हायचं असेल, तर त्यासाठी पालकांची पूर्वपरवानगी आवश्यक असेल.
का आहे ही पावलं आवश्यक?
अलीकडच्या काळात किशोरवयीन मुलांमध्ये सोशल मीडियाचं अतिवापर वाढलेलं दिसत आहे. काही प्रकरणांमध्ये सोशल मीडिया हे व्यसनाचे रूप घेऊन मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करत असल्याचं समोर आलं आहे. अनेक ऑनलाइन ट्रेण्ड्स, चॅलेंजेस आणि अनोळखी लोकांशी संवाद यामुळे मुलं विविध प्रकारच्या धोक्यांना सामोरी जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर अमेरिकेत ‘किड्स ऑनलाइन सेफ्टी अॅक्ट (KOSA)’ नावाचा महत्त्वाचा कायदा तयार केला जात आहे. या कायद्याअंतर्गत सोशल मीडिया कंपन्यांना मुलांच्या डिजिटल सुरक्षेसाठी अधिक कठोर नियमांचं पालन करणं बंधनकारक केलं जाईल.
मेटा, टिकटॉक आणि यूट्यूबवर वाढते आरोप
2023 मध्ये अमेरिकेतील 33 राज्यांनी मेटा कंपनीवर खटले दाखल केले. त्यामध्ये मेटाने सोशल मीडियाचे धोके लपवले, आणि मुलांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप होते. हेच आरोप टिकटॉक आणि यूट्यूबसारख्या इतर कंपन्यांवरही झाले आहेत. अनेक पालकांनी आणि शाळांनी या प्लॅटफॉर्म्सवर सामाजिक आणि मानसिक परिणामांबाबत चिंता व्यक्त केली आहे.
फीचरमध्ये आणखी काय विशेष?
मुलांना अश्लील कंटेंटपासून दूर ठेवण्यासाठी एक महत्त्वाचा बदल म्हणजे, डायरेक्ट मेसेजमध्ये जर न्यूड किंवा अश्लील फोटो पाठवला गेला, तर मेटाचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञान तो फोटो आपोआप धुंद (ब्लर) करेल. यामुळे अनावश्यक आणि धोकादायक कंटेंटपासून संरक्षण मिळेल.
नवीन कायदे आणि बदल कधीपासून लागू होतील?
जुलै 2024 मध्ये अमेरिकन सिनेटने ‘KOSA’ आणि ‘The Children and Teens’ Online Privacy Protection Act’ ही दोन विधेयके मंजूर केली. हे कायदे लागू झाल्यानंतर सोशल मीडिया कंपन्यांना अल्पवयीन युजर्सच्या सुरक्षेसाठी अधिक पारदर्शक आणि जबाबदार धोरणं अवलंबावी लागणार आहेत.