घर खरेदी केल्यानंतर फक्त रजिस्टर झालं म्हणून निवांत राहू नका, त्यानंतर इथे पण नोंद करा
घर किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करताना काही नियम आपल्याला माहित हवेत. कोणतीही मालमत्ता खरेदी केली आणि त्याचे रजिस्ट्रेशन करुन घेतले म्हणजे आपण मालक झालो असं होत नाही. त्यासाठी पुढे काही कायदे आहेत. त्यानुसार तुम्हाला रजिस्ट्रेशननंतर आणखी एक गोष्ट करावी लागते तेव्हाच तुम्ही मालक होता.

property mutation : आपण कोणतीही मालमत्ता खरेदी केल्यानंतर तहसीलमध्ये त्याची नोंद केली की मालक झालो असं समजतो. पण तुम्हाला ही गोष्ट माहित हवी की, नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला त्या मालमत्तेचे मालक होण्यासाठी आणखी एका ठिकाणी नोंद करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही दुकान, प्लॉट किंवा घर खरेदी केल्यानंतर विक्रेत्याला संपूर्ण रक्कम देऊन टाकता. याची नोंदणी करूनही तुम्ही त्या मालमत्तेचे पूर्ण मालक होत नाही. त्यासाठी तुम्हाला आणखी एक ठिकाणी नोंद करावी लागेल जेणेकरुन पुढे वाद निर्माण होणार नाही.
एकाच व्यक्तीने एक मालमत्ता दोन किंवा त्याहून अधिक लोकांना विकल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. विक्रेत्याने विकलेल्या मालमत्तेची खरेदीदाराच्या नावे नोंद करूनही जमिनीवर कर्ज घेतले जाते अशी ही बातमी तुम्ही ऐकली असेल. हे सगळे घडते कारण जमीन खरेदीदाराने फक्त नोंदणी केली आहे. त्याने त्याची मालमत्ता त्याच्या नावावर हस्तांतरित केलेली नाही.
नोंदणीनंतर म्यूटेशन देखील आवश्यक
भारतीय नोंदणी कायद्यानुसार, 100 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेचे हस्तांतरण झाल्यास ते लिखित स्वरूपात असावे. त्याची नोंदणी उपनिबंधक कार्यालयात केली जाते. हा नियम संपूर्ण देशात लागू आहे आणि त्याला नोंदणी म्हणतात. पण केवळ नोंदणी केल्याने तुम्ही जमीन, घर किंवा दुकानाचे पूर्ण मालक होत नाही. नोंदणीनंतर म्यूटेशन करणे देखील खूप महत्वाचे असते.
नोंदणी केली म्हणून निवांत राहू नका
रजिस्ट्री हा केवळ मालकी हस्तांतरणाचा दस्तऐवज आहे. मालकीचा नाही. त्यामुळे मालमत्तेची नोंदणी झाल्यानंतर तुम्ही त्या नोंदणीच्या आधारे म्यूटेशन करुन घ्या. तेव्हा तुम्ही त्या मालमत्तेचे पूर्ण मालक बनता. त्यामुळे म्यूटेशन केल्यानंतरच निवांत व्हा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कळवा.