ज्यांना बोटंच नसतात त्यांना शाई कुठे लावतात?; तुम्हाला माहीत आहे काय?
महाराष्ट्र आणि झारखंडमधील सध्याच्या निवडणुकांमध्ये अपंग मतदारांना मतदानाच्यावेळी शाई कशी लावली जाते याविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जर एखाद्या व्यक्तीला तर्जनी नसेल तर त्याच्या इतर बोटाला किंवा दुसऱ्या हाताला किंवा अगदी पायालाही शाई लावता येते. ही शाई निवडणुकीत गैरप्रकार टाळण्यासाठी लावली जाते.
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये सध्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आज प्रचाराची सांगता होईल. त्यानंतर येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर लगोलग 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल येणार आहे. त्यानंतर दोन्ही राज्यात सरकारची स्थापना होणार आहे. पण या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक रंजक प्रश्न मतदारांना पडताना दिसत आहेत. एक म्हणजे मतदान करताना आपल्या बोटांवर खास प्रकारची शाई लावली जाते. डाव्या हाताच्या तर्जनीला शाई लावली जाते. पण एखाद्या मतदाराला तर्जनीच नसेल. हाताला बोटेच नसतील तर त्याला शाई कुठे लावतात हे माहीत आहे का? आज आपण त्याचीच माहिती देणार आहोत.
डाव्या हाताला तर्जनी नसेल तर?
समजा एखाद्याच्या डाव्या हाताला तर्जनीच नसेल तर काय होईल? अशा परिस्थितीत शाई कुठे लावली जाईल? अशावेळी मतदाराच्या डाव्या हाताच्या कोणत्याही बोटाला शाई लावली जाते. किंवा डाव्या हाताला तर्जनी नसेल तर उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावली जाते.
उजव्या हाताला तर्जनी नसेल तर?
जर मतदाराच्या उजव्या हाताला तर्जनी नसेल तर उजव्या हाताच्या कोणत्याही बोटाला शाई लावली जाते. जर त्याच्या दोन्ही हातांना करंगळी नसेल तर दोन्ही हातांच्या कोणत्याही भागावर शाई लावली जाऊ शकते. जर एखाद्या मतदाराला दोन्ही हात नसेल तर त्याच्या पायाच्या अंगठ्याला शाई लावली जाते.
शाई का लावली जाते?
निवडणुकीत घोटाळा आणि फसवणूक टाळण्यासाठी शाई लावली जाते. एकदा का शाई लावली तर ती निघण्यासाठी बरेच दिवस जातात. त्यामुळे मतदारांचं बोगस मतदानही पकडणं शक्य आहे. जर एखादा मतदार मतदान केल्यानंतर वेषांतर करून दुसऱ्या मतदाराच्या नावाने मतदान करायला आला तर त्याला शाईमुळे पकडता येऊ शकते. मतदारांनी मतदान केल्याची खूण म्हणजे शाई आहे. त्यातून बोगस मतदान रोखता येतं. शिवाय एक व्यक्ती, एक मतही जपता येतं.
घरातून मतदान
दरम्यान, निवडणूक आयोगाने गेल्या काही वर्षात अनेक महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत. दिव्यांग व्यक्तींना आणि 85 वर्षावरील ज्येष्ठांना घरून मतदान करण्याची सोय करून दिली आहे. त्यामुळे दिव्यांग आणि बुजुर्गांना रांगेत उभं राहण्याची गरज पडणार नाही.