Republic Day 2022 | राष्ट्रध्वज फडकवण्याचे काही नियम आणि कायदे आहेत… प्रत्येक भारतीयाला याची माहिती हवी…
आज सर्वत्र मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. ठिकठिकाणी राष्ट्रध्वज फडकावत अभिवादन करण्यात येत आहे. परंतु राष्ट्रध्वज फडकवण्याचे काही नियम आणि कायदे आहेत. तिरंग्याबाबत लोकांमध्ये काही गैरसमजही आहेत. अलीकडेच ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनला त्यांच्या उत्पादनांवर तिरंगा वापरल्याबद्दल सोशल मीडियावर ‘ट्रोल’ करण्यात आले होते.
मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने देशभरात विविध ठिकाणी आपला राष्ट्रध्वज तिरंगा (National flag) फडकवला जातो. तिरंगा ध्वज पहिल्यांदा 7 ऑगस्ट 1906 रोजी पारसी बागान चौक, कोलकाता येथे लाल, पिवळ्या आणि हिरव्या पट्ट्यांसह फडकवण्यात आला. यानंतर तिरंग्याचा आकार अनेक वेळा बदलला. तिरंग्याच्या राष्ट्रध्वजाचे सध्याचे स्वरूप 22 जुलै 1947 रोजी स्वातंत्र्याच्या काही दिवस आधी (15 ऑगस्ट 1947) झालेल्या भारतीय संविधान सभेच्या बैठकीत स्वीकारण्यात आले होते. राष्ट्रध्वज हा नेहमी सूती, रेशीम किंवा खादीचा असावा. प्लास्टिकचे (Plastic) ध्वज बनवण्यास मनाई आहे. तिरंग्याचा आकार (Size) नेहमी आयताकृती असेल, त्याची साइज 3 : 2 अशी असते. त्याच वेळी, पांढर्या पट्टीच्या मध्यभागी असलेल्या अशोक चक्रामध्ये 24 आरे असणे आवश्यक आहे. राष्ट्रध्वजाचा वापर आणि तो फडकवण्यासाठी ध्वजसंहिता तयार करण्यात आली आहे. हा कायदा तिरंगा फडकवण्याचे नियम आणि कायदे (Flag Hosting rules) ठरवतो. याबाबत भारतीय माहिती सेवा अधिकारी (IIS) डॉ. प्रेम कुमार यांनी अधिक माहिती दिली आहे. डॉ. प्रेम हे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या बिलासपूर, छत्तीसगड येथील क्षेत्रीय प्रचार कार्यालयात क्षेत्रीय प्रचार अधिकारी आहेत.
नाहीतर होतो तुरुंगवास
डॉ. प्रेम यांनी सांगितले, की तिरंगा हे राष्ट्रीय सन्मानाचे प्रतीक आहे आणि त्याचा व्यावसायिकरित्या वापर केला जाऊ शकत नाही. विशेषत: त्याबद्दल देशात ‘फ्लॅग कोड ऑफ इंडिया’ नावाचा कायदा आहे. यामध्ये तिरंगा फडकवण्याचे नियम घालून दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना तुरुंगवासही होऊ शकतो. देशात फक्त कर्नाटकातील नरगुंड किल्ला, महाराष्ट्रातील पन्हाळा किल्ला आणि मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील किल्ला या तीनच ठिकाणी 21×14 फूट उंचीचे राष्ट्रध्वज फडकवले जातात.
घरावरही तिरंगा फडकावू शकता
डॉ. प्रेम यांनी सांगितले, की पूर्वी सामान्य लोकांना त्यांच्या घरांवर किंवा प्रतिष्ठानांवर तिरंगा फडकावण्याची परवानगी नव्हती. रात्रीच्या वेळीही तो फडकवण्यास मनाई होती. 22 डिसेंबर 2002 नंतर सामान्य लोकांना त्यांच्या घरांमध्ये किंवा कार्यालयात परवानगी मिळाली. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी तिरंगा फडकवण्याची परवानगी 2009 साली देण्यात आली होती. स्टेजवर तिरंगा फडकवताना वक्त्याचे तोंड श्रोत्यांकडे असते तेव्हा तिरंगा नेहमी उजव्या बाजूला असावा.
या गोष्टी आहेत निषिद्ध
1) ध्वजावर काहीही लिहिणे, बनवणे बेकायदेशीर आहे. 2) राष्ट्रध्वज कोणत्याही वाहनाच्या मागे, विमानात किंवा जहाजावर लावता येत नाही. 3) राष्ट्रध्वज कोणत्याही वस्तू, इमारती आदी झाकण्यासाठी वापरता येत नाही. 4) कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वज जमिनीला स्पर्श करू नये. 5) ध्वजाचा वापर गणवेशासाठी किंवा सजावटीसाठी करता येत नाही. 6) राष्ट्रध्वजापेक्षा दुसरा कोणताही ध्वज ठेवता किंवा उंच करता येत नाही.
भारतीय राज्यघटनेनुसार, राष्ट्र विभूती असलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ध्वज काही काळ खाली केला जातो आणि राष्ट्रीय शोक घोषित केला जातो. ज्या इमारतीत त्या विभूतीचे पार्थिव ठेवण्यात आले आहे, त्याच इमारतीचा तिरंगा खाली केला जातो. मृतदेह इमारतीच्या बाहेर काढल्यानंतर तिरंगा पूर्ण उंचीवर फडकवला जातो. त्याचबरोबर देशातील महान व्यक्ती आणि हुतात्म्यांच्या पार्थिवांना तिरंग्यात गुंडाळून आदरांजली वाहिली जाते. मात्र, तिरंग्याची भगवी पट्टी डोक्याच्या बाजूला आणि हिरवी पट्टी पायाला असावी, याची काळजी घेतली जाते.
संबंधित बातम्या :