गरिबांसाठी उन्हाळा जीवघेणा, उष्माघाताने दरवर्षी किती लोकांचे जातात प्राण? आकडे वाचून हादराल
उन्हाळा अनेकांसाठी सुट्टीचा काळ असला, तरी भारतातील हजारो गरीब आणि कष्टकरी लोकांसाठी तो जीवघेणा ठरतो. विश्वास बसणार नाही, पण सरकारी आकडे तर हेच सांगतात.....

उन्हाळा आला की आपल्या मनात आंबा, थंड सरबत आणि सुट्ट्यांचा आनंद येतो. काही जण एसी-कूलरच्या थंड हवेत बसून हा हंगाम आरामात घालवतात. पण याच उन्हाळ्याचं एक दुसरं कटू वास्तव आहे, जे आपण अनेकदा दुर्लक्षित करतो ते म्हणजे रस्त्यावर, झोपडपट्ट्यांमध्ये किंवा मोकळ्या जागांवर राहणाऱ्या गरीब लोकांचं भयाण आयुष्य! सरकारी आकड्यांनुसार सांगतात की गेल्या ८ वर्षांत ४ हजारांहून अधिक लोकांनी फक्त उष्माघाताने जीव गमावला आहे ! कोण आहेत हे लोक? आणि का बसतोय त्यांना उन्हाळ्याचा एवढा मोठा फटका? जाणून घ्या उन्हाळ्याचं हे भीषण वास्तव!
जिथं आपल्याला घरात असतानाही गरमी असह्य वाटते, तिथं या कष्टकरी आणि गरीब कुटुंबांना छताशिवाय, सावलीशिवाय आणि पाण्याविना उन्हाशी झुंज द्यावी लागते. दिवसभर उन्हात मजुरी करणं, फेरीवाल्यांचं काम करणं, रस्त्यांवर फिरणं हा त्यांचा रोजचा संघर्ष असतो. यामुळे उष्माघात (Heatstroke) होऊन जीव जाण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो.
सरकारी आकडे : सरकारने लोकसभेत सादर केलेल्या माहितीनुसार, २०१५ ते २०२३ या आठ वर्षांत देशभरात उष्णतेच्या लाटेमुळे तब्बल ४०५७ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातही २०१५ हे वर्ष सर्वात धक्कादायक ठरलं, कारण एका वर्षात तब्बल २०४० जणांचा जीव उष्माघातामुळे गेला.




२०१६ मध्येही ही स्थिती गंभीर होती. त्या वर्षी ११०२ लोकांनी उन्हामुळे आपला जीव गमावला. नंतरच्या काळात आकडे कमी-जास्त झाले, पण धोका मात्र कमी झालेला नाही.
हे फक्त सरकारी आकडे आहेत. प्रत्यक्षात, ग्रामीण भागांमध्ये किंवा मागासलेल्या ठिकाणी, वेळेवर उपचार मिळत नसल्याने मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.
गरिबांना सर्वाधिक फटका का बसतो?
उष्णतेचं संकट सगळ्यांसाठी त्रासदायक असलं तरी, गरीब लोकांसाठी ते जीवघेणं ठरतं. यामागची प्रमुख कारणं आहेत:
1. निवाऱ्याचा अभाव : पक्कं घर, एसी, कूलर यांसारखी सोय नसल्यामुळे त्यांना थेट सूर्याच्या कडाक्यात राहावं लागतं.
2. कामाचं स्वरूप : बहुतेक वेळा या लोकांना रोजीरोटीसाठी उन्हातच काम करावं लागतं — उदा. बांधकाम कामगार, शेतमजूर, फेरीवाले.
3. अल्प आहार आणि पाण्याची टंचाई : गरिबीमुळे पोषक अन्न आणि शुद्ध पाणी मिळणं कठीण असतं, त्यामुळे शरीराची झीज लवकर होते.
4. जागरूकतेचा अभाव : उष्माघाताची लक्षणं समजत नाहीत आणि वेळेत उपचार मिळत नाहीत, यामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण वाढतं.
उन्हाळ्याच्या या झळा रोखण्यासाठी प्रशासनाकडून तात्पुरत्या सावलीसाठी शेड्स, पाणीपुरवठा आणि जनजागृती मोहिमा राबवणं गरजेचं आहे.
उन्हाळा आपल्या आनंदाचा हंगाम असला तरी, गरिबांसाठी तो मृत्यूचं सावट घेऊन येतो. त्यामुळे, समाज आणि प्रशासन या दोघांनी मिळून उपाययोजना करणं ही काळाची गरज आहे.