प्रेमाचे प्रतीक असलेला ‘ताजमहल’, या कारणामुळे बांधला गेला
जगातील सातवे आश्चर्य ताजमहल आहे. शहाजहान याने प्रेमाचे प्रतीक म्हणून त्याच्या पत्नीच्या स्मरणार्थ ताजमहल बांधला आहे. शहाजहानने पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ ताजमहल बांधला असला तरी त्याने एक नव्हे तर 14 लग्न केले होते असे सांगितले जाते.
प्रेमासाठी लोक वाट्टेल ते करायला तयार होतात. प्रेमामुळेच मुगल सम्राट जहांगीरचा मुलगा शहाजहानने आपली पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ ताजमहल बांधला आहे. पण त्याने एक दोन नव्हे तर तब्बल 14 लग्न केले होते. शेवटच्या मुलाच्या जन्मावेळी मुमताजला आग्रा ते मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर असा 787 किलोमीटरचा प्रवास करावा लागला होता. प्रसूती वेदनेमुळे तिचा 1631 मध्ये मृत्यू झाला. पाच जानेवारी 1592 रोजी लाहोर येथे जन्मलेल्या शहाजहान आणि मुमताज यांची प्रेम कहानी इतिहासात अजरामर झाली आहे. मुमताजच्या मृत्यूनंतर त्याच्या अफाट प्रेमाला अमर करण्यासाठी शहाजहान याने मुमताज च्या कबरीवर ताजमहाल बांधला. जो आजही प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखला जातो.
कैरोलीन अर्नोल्ड आणि मेडेलीन कोमुरा यांचे ताजमहल हे पुस्तक आहे. या पुस्तकाचा संदर्भ देत बीबीसी ने आपल्या एका रिपोर्टमध्ये मुमताजचे खरे नाव अर्जुमंद बानो असल्याचं म्हटले आहे. अर्जुमंद बानोची आत्या महर- उन- निसा हिने 1611 मध्ये अकबराचा मुलगा जहांगीर सोबत लग्न केले होते. आपण सगळे त्याला नूरजहा या नावाने ओळखतो. अर्जुमंदच्या समजूतदारपणामुळे आणि दूरदृष्टीमुळे तिच्या वडिलांनी आणि आजोबांनी तिला उच्च शिक्षण दिले.
रेणुका नाथ यांचे पुस्तक ‘नोटेबल मुगल एंड हिंदू वुमन इन द सिक्सटींथ एंड सेवेंटींथ सेंचुरीज एडी यात त्यांनी अर्जुमंद बानो अरबी आणि फारसी भाषेची जाणकार होती असे लिहिले आहे. तसेच ती कविता लिहायची. जहांगीर समोर जेव्हा शहाजहानने अर्जुमंद बानो सोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा ते सहज तयार झाले होते. पण जेव्हा लग्नासाठी मुहूर्त पाहिला गेला तेव्हा पाच वर्षानंतरची शुभ तिथी ठरवण्यात आली होती म्हणजेच शहाजहानला लग्न ठरल्यानंतर पाच वर्ष थांबावे लागले होते. असे सांगितले जाते की शहाजहान आणि मुमताजचे लग्न 1607 मध्ये ठरले होते आणि लग्न 1612 मध्ये मोठ्या थाटामाटात झाले होते.
इतिहासकारांच्या मते शहाजहानने अर्जुमंद बानोला त्या काळातील सर्व स्त्रियांमध्ये सर्वात खास असल्याचे घोषित केले आणि तिला मुमताज ही पदवी दिली होती. मुघल काळातील दरबारी इतिहासकार मोतमिद खान याने इकबालनामा जहांगिरी लिहिली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की शहाजहानचे मुमताजवर जेवढे प्रेम होते तेवढे इतर पत्नींवर नव्हते.
मुमताजचा मृत्यू
इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार मुमताज हिच्याशी लग्न ठरल्यानंतर लग्नाची वेळ येईपर्यंत शहाजहानचे तीन लग्न झाले होते. मुमताज ही शहाजहानची चौथी पत्नी होती. इतिहासकारांच्या मते शहाजहानच्या कारकीर्दीत लोधींनी उठाव केला तेव्हा शहाजहान हे मुमताजला सोबत घेऊन बुऱ्हानपूरला गेले होते. लांबचा प्रवास केल्यामुळे आणि त्यात प्रसूती वेदना झाल्यामुळे मुमताजचा त्यामध्ये मृत्यू झाला. मुमताजच्या मृत्यूनंतर शहाजहानने शपथ घेतली होती की तिच्या कबरीवर अशी इमारत बांधायची जी जगात इतर कोणतीही इमारत नसेल आणि त्यानंतर ताजमहल बांधला गेला.