लाल अन् निळ्या रंगाच्या कोचमध्ये काय असतो फरक, दोन्ही पैकी कोणते जादा सुरक्षित?
Red and Blue Train Coaches Difference:लिंक हॉफमन बुशचे डबे इंटिग्रल कोच फॅक्टरी कोचपेक्षा चांगले आहेत. LHB डबे हे ICF डब्यांपेक्षा 1.7 मीटर लांब असतात, म्हणूनच त्यांच्या बसण्याची जागा जास्त असते. तसेच हे डबे स्टेनलेस स्टीलचे बनलेले असल्यामुळे ते ICF डब्यांपेक्षा हलके आहेत.
Red and Blue Train Coaches Difference: भारतात सर्वाधिक प्रवाशी भारतीय रेल्वेने प्रवास करतात. रोज रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांना कधी निळ्या रंगाचे कोच असणाऱ्या गाड्यांमधून तर कधी लाल रंगाचे कोच असणाऱ्या गाड्यांमधून प्रवास करावा लागतो. परंतु या दोन रंगाच्या कोचमध्ये काय फरक असतो? का काही गाड्यांचे कोच लाल तर काहींचे कोच निळे असतात, जाणून घेऊ या…
रेल्वेमध्ये लाल आणि निळ्या रंगाचे कोच असते. हा रंग कोचमधील फरक स्पष्ट करणार आहे. निळ्या रंगाच्या कोचला ICF म्हणजे इंटीग्रल कोच फॅक्टरी (Integral Coach Factory) म्हणतात. लाल रंगाच्या कोचला LHB लिंक हॉफमॅन बुश (Linke-Hofmann-Busch) म्हटले जाते. या दोन्ही कोचमध्ये फक्त रंगाचा फरक नसतो. हे दोन्ही कोच खूप भिन्न असतात.
कुठे आहे कारखाना…
तामिळनाडूमधील चेन्नईत इंटीग्रल कोच फॅक्टरीचा कारखाना आहे. त्या कारखान्यात निळ्या रंगाचे डबे बनवले जातात. या कोच कारखान्याची स्थापना स्वातंत्र्यानंतर 1952 मध्ये झाली. तेव्हापासून येथे ट्रेनचे डबे तयार केले जात आहेत. इंटीग्रल कोच फॅक्टरीने बनवलेले निळ्या रंगाचे डबे लोखंडापासून बनवलेले आहेत. या डब्यांमध्ये एअर ब्रेक्सचा वापर करण्यात आला आहे. हे डबे 110 किलोमीटरपर्यंत वेग सहन करु शकतात.
निळ्या कोचचे वैशिष्ट्य काय?
निळ्या रंगाच्या कोचमध्ये स्लीपर क्लासमध्ये 72 जागा आहेत. तसेच एसी-3 क्लासमध्ये 64 जागा आहेत. इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये बनवलेल्या डब्यांना 18 महिन्यांतून एकदा ओव्हरहॉलिंग करणे आवश्यक असते. यामुळे या कोचच्या देखभालीसाठी अधिक खर्च येतो. निळ्या रंगाचे डबे दुहेरी बफर प्रणालीद्वारे एकमेकांना जोडलेले आहेत. एखाद्या अपघाताच्या वेळी हे डबे एकमेकांवर चढण्याचा धोका असतो, ज्यामुळे अपघाताची भीषणता वाढते.
मग लाल रंगाचे डबे काय
लिंक हॉफमन बुश म्हणजे लाल कोच 2000 मध्ये जर्मनीहून भारतात आणले होते. हे कोच बनवणारा कारखाना पंजाबमधील कपूरथला येथे आहे. हे कोच स्टेनलेस स्टीलचे आहेत. त्यामध्ये डिस्क ब्रेक वापरले आहे. या डब्यांना 24 महिन्यांतून एकदा ओव्हरहॉलिंगची आवश्यकता असते. त्यामुळे त्याचा देखभालीचा खर्च कमी येतो. हे डबे 200 किलोमीटर प्रति तास वेग सहन करु शकतात. या कोचच्या स्लीपर क्लासमध्ये 80 जागा आहेत तर एसी-3 क्लासमध्ये 72 जागा आहेत.
अपघाताच्या वेळी लाल डबे अधिक सुरक्षित
लिंक हॉफमन बुशचे डबे इंटिग्रल कोच फॅक्टरी कोचपेक्षा चांगले आहेत. LHB डबे हे ICF डब्यांपेक्षा 1.7 मीटर लांब असतात, म्हणूनच त्यांच्या बसण्याची जागा जास्त असते. तसेच हे डबे स्टेनलेस स्टीलचे बनलेले असल्यामुळे ते ICF डब्यांपेक्षा हलके आहेत. अपघात झाला तरी निळ्या रंगाच्या डब्यांपेक्षा लाल रंगाचे डबे सुरक्षित असतात. राजधानी आणि शताब्दी सारख्या भारतीय रेल्वे गाड्यांना अधिक वेगाने धावण्यासाठी लाल डबे प्रामुख्याने वापरले जातात. गरीब रथमध्ये हिरव्या कोचचा वापर केला जातो.