आकाशाला शेवट आहे का? वैज्ञानिकांनी अखेर उलगडलं ब्रह्मांडाचं रहस्य!
आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलं की आकाश आणि ब्रह्मांड याला कोणताही शेवट नाही. पण विज्ञानातील प्रगतीमुळे आता शास्त्रज्ञांनी ब्रह्मांडाचं मोजमाप करण्याचा एक अंदाज लावण्यात यश मिळवलं आहे. तरी अखेर प्रश्न तसाच आहे की ब्रह्मांड खरंच इतकंच आहे, की यापलीकडे अजून काहीतरी अज्ञात जग दडलेलं आहे?

आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की, आकाश अनंत आहे आणि त्याला कुठेच शेवट नाही. हे ब्रह्मांड किती मोठं आहे याचा नेमका अंदाज लावणं अशक्यच मानलं जातं. मात्र विज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे हे रहस्य आता थोडं थोडं उलगडू लागलं आहे. शास्त्रज्ञांनी वर्षानुवर्षं केलेल्या संशोधनातून अखेर ब्रह्मांडाचं मोजमाप करण्याचा एक आशयपूर्ण आणि अचंबित करणारा अंदाज समोर आला आहे.
‘ब्रह्मांड किती मोठं आहे?’ या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ अनेक दशकांपासून करत आहेत. २०१६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शास्त्रीय अहवालानुसार, ब्रह्मांडाचं सध्याचं मोजमाप सुमारे ९३ अब्ज प्रकाशवर्ष एवढं असल्याचं स्पष्ट झालं आहे. इथं ‘प्रकाशवर्ष’ हा एक खास मापक वापरला जातो. प्रकाश एका सेकंदात सुमारे दोन लाख किमीचे अंतर पार करतो. त्यामुळे एका वर्षात प्रकाश जितकं अंतर पार करतो, ते अंतर मोजण्यासाठी ‘प्रकाशवर्ष’ ही कल्पना वापरण्यात आली आहे.
आपलं संपूर्ण ब्रह्मांड हे विविध घटकांनी बनलेलं आहे. पृथ्वी, सूर्य, ग्रह, तारे, आकाशगंगा या सगळ्या गोष्टी ब्रह्मांडाच्या महाकाय रचनेत सामील आहेत. आपली पृथ्वी ही सौरमालेचा एक लहानसा भाग आहे, तर सूर्य हा देखील केवळ एक तारा आहे जो ‘मिल्की वे’ या आपल्या आकाशगंगेत स्थित आहे. विशेष म्हणजे, आपल्या आकाशगंगेची लांबीच जवळपास एक लाख ते दीड लाख प्रकाशवर्ष एवढी आहे.
हेच नव्हे तर, आपल्या ब्रह्मांडात अशा ‘मिल्की वे’सारख्या असंख्य आकाशगंगा आहेत, ज्या अजूनही विज्ञानाच्या नजरेआड आहेत आणि त्यांचा शोध सुरुच आहे. २०२२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधन अहवालानुसार, ब्रह्मांडाच्या संपूर्ण नकाशाचं स्वरूप समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी तब्बल सहा वेळा मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण केलं. यामध्ये एक महत्वाची बाब उघडकीस आली की, ब्रह्मांडात ३० ते २०० मेगापारसेक्स लांबीचे प्रचंड आकाराचे रचनात्मक घटक अस्तित्वात आहेत.
या घटकांमध्ये गॅलेक्सी क्लस्टर्स, सुपरक्लस्टर्स, नेब्युला, तारे, ग्रह, सुपरनोवा आणि फिलामेंट्स यांचा समावेश आहे. ही सगळी रचना इतकी व्यापक आणि आकर्षक आहे की त्याचं पूर्णत: समजणं सध्यातरी मानवाच्या आकलनाच्या बाहेरचं आहे. या असंख्य गॅलेक्सी आणि अंतराळातील रचनांच्या एकत्रित व्यवस्थेला शास्त्रज्ञ ‘कॉस्मिक वेब’ किंवा ‘ब्रह्मांडाचं जाळं’ म्हणतात.
हे ‘कॉस्मिक वेब’ म्हणजे नेमकं काय? तर हे आहे आकाशगंगांचे विशाल समूह, त्यांच्यातील असंख्य रिक्त जागा आणि त्या रिक्त जागेतील उर्जेचं अदृश्य जाळं! या जाळ्यातून ब्रह्मांडातली प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे. आजही शास्त्रज्ञ याच जाळ्याचा शोध घेण्याच्या प्रयत्नात आहेत, कारण ब्रह्मांडाचं हे गूढ पूर्णपणे उलगडायला अजून बराच काळ जाईल, हे निश्चित!