7000 कोटींच्या कर्जातून कंपनीला काढले बाहेर, पतीच्या आत्महत्येनंतर ‘कॅफे कॉफी डे’ला मालविका हेगडे यांची नवीसंजीवनी
देशभरातील अनेक तरुण-तरुणींना प्रेमाची कबुली देण्याची, निवांत बोलण्याची अनेक मोठ्या बिझनेस डील होण्याची हक्काची जागा कॅफे कॉफी डे ने पटकावली. मात्र हा उद्योग जेव्हा संकटात सापडला, तेव्हा मोठ्या धिटाईने मालविका हेगडे यांनी कॅफे कॉफी डेला पुन्हा वैभवाचे दिवस आणून दिले.
मुंबई : आठवड्याचा शेवट मस्तीत घालवायचा, मित्रांसोबत गप्पांचा फड रंगवायचा, पहिल्यांदा प्रेमाची कबुली देण्याचे आणि कुटुंबियांसोबत वेळ घालविण्याचे, एवढेच नाही तर चांगल्या बिझनेस डीलनंतर त्याचा आनंद लुटण्याचे एकमेव ठिकाण कॅफे कॉफी डे (Cafe Coffee Day) होते. भारतात निवांत गप्पा मारता येईल असे हक्काचे ठिकाण कॅफे कॉफी (Coffee) डेने मिळवून दिले होते. परंतू, या ब्रँडचे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांनी आत्महत्या केल्याची वार्ता जुलै 2019 मध्ये येऊन धडकली आणि सर्वांनाच धक्का बसला. हा ब्रँड 7000 कोटींच्या कर्जात रुतला होता. पतीच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी मालविका हेगडे यांनी न डगमगता या ब्रँडला सोनेरी दिवस आणले आहे. हा ब्रँड पुन्हा झळाळू लागला आहे.
7000 कोटींचे कर्ज, पतीचा मृत्यू
कर्नाटकमधील व्ही. जी. सिद्धार्थ यांनी 1996 मध्ये देशभरात कॉफी शॉपची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. सर्वांसाठी गप्पांचा फड रंगवायला एक निवांत हक्काची जागा असावी अशी त्यांची संकल्पना होती. कंपनीने घौडदौड सुरु केली. देशभरातील छोट्या-मोठ्या शहरात कॅफे कॉपी डेच्या पाट्या झळकू लागल्या. सर्व काही चांगले सुरु असतानाच कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व्हीजी सिद्धार्थ यांच्या आत्महत्येची वाईट बातमी आली. 7000 कोटींचे कर्ज, पतीचा मृत्यू या एकापाठोपाठ एक आलेल्या धक्क्यातून सावरत मालविका हेगडे यांनी या व्यवसायाला गतवैभव मिळवून दिले.
मालविका हेगडे कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी
मालविका हेगडे या कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा यांची मुलगी आहे. 1969 मध्ये बेंगळुरू शहरात त्याचा जन्म झाला. तिथे त्यांचे शिक्षण झाले आणि त्यानंतर त्यांनी बेंगळुरू विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. 1991 मध्ये व्ही जी सिद्धार्थ यांच्याशी त्यांचे लग्न झाले. कॅफे कॉफी डेच्या (सीसीडी) मुख्य कार्यकारी अधिकारी होण्यापूर्वी त्या अनेक वर्षांपासून या कंपनीच्या स्वीकृत सदस्य होत्या.
दोनच वर्षात व्यवसायाला उभारी
पतीच्या आत्महत्येनंतर मालविका हेगडे यांनी दोनच वर्षात व्यवसाय सावरला आणि त्याला उभारी दिली. 2019 मध्ये 7000 कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा असलेली ही कंपनी अत्यंत कमी वेळात सावरली . कंपनीच्या निवेदनानुसार, सीसीडीवर मार्च 2021 पर्यंत 1779 रुपयांचे कर्ज शिल्लक राहिले आहे, ज्यात 1263 कोटी रुपयांचे दीर्घकालीन कर्ज आणि 516 कोटी रुपयांचे अल्पकालीन कर्जाचा समावेश आहे, असे इंडिया टाइम्सने वृत्त दिले आहे.
देशभरात 572 कॅफे, 333 किऑस्क आणि 36,326 व्हेंडिंग मशीन्स
सीसीडी हा भारतीय संस्कृतीचा एक भाग बनला आहे. दिल्ली, मुंबई, चंदीगडसह देशभरातील १६५ शहरांमध्ये ५७२ कॅफे आहेत. कंपनीकडे ३३३ एक्सप्रेस किऑस्क (किऑस्क) देखील आहेत अहवालानुसार, सीसीडी हा सध्या 36,326 व्हेंडिंग मशीनसह भारताचा सर्वात मोठा कॉफी सर्व्हिंग ब्रँड आहे. मालविकाचे उद्दीष्ट सर्व कर्ज फेडून हा व्यवसाय वाढविण्याचा आहे. आपल्या दिवंगत पतीच्या पावलावर पाऊल ठेवत मालविकाचे स्वप्न देशाच्या कानाकोपऱ्यात कॅफे कॉफी नेण्याचे आहे.
इतर बातम्या :
Goa Elections 2022 | गोवा विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, महाविकास आघाडीचा प्रयत्न फसणार ?
Nashik|मालेगाव MIDC ची जलद उभारणी; वस्त्रोद्योग पार्क, अजंग प्रकल्पाच्या भूखंड वाटप दरास मुदतवाढ