पुस्तकांचा आकार चौरसच का असतो? जाणून घ्या यामागचा इतिहास !
पुस्तक म्हणजे ज्ञानपेटी ! जे आपल्याला वेळोवेळी ज्ञान प्रदान करतें.. परंतु कधी हा विचार केला आहे का की या जगात जिथे प्रत्येक वस्तूचा वेग-वेगळा आकार असतो तिथे पुस्तक इतकं साधं आणि सरळ का असतं? चला या आर्टिकल द्वारे समजून घेऊया त्या मागचा इतिहास

वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं.. आपल्या आयुष्यात वाचनाचे स्थान फार महत्त्वाचे आहे. ज्ञान मिळवण्यापासून ते विचार समृद्ध करण्यापर्यंत, पुस्तके आपल्याला अनेक प्रकारे घडवतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की सर्व पुस्तके प्रामुख्याने चौरस किंवा आयताकृतीच का असतात? मोबाईल्स, कार्स, फर्निचर अशा अनेक गोष्टींचे डिझाईन सतत बदलत असताना, पुस्तकांचा आकार मात्र तसाच का टिकून आहे? चला, जाणून घेऊया यामागचा इतिहास
प्रॅक्टिकल डिझाईनचा विचार
पुस्तकांचे चौरस किंवा आयताकृती डिझाईन हे त्याच्या साठवणुकीच्या सोयीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. अशी पुस्तके व्यवस्थित रचता येतात, बॅगेत ठेवता येतात आणि कपाटात जागा वाचवता येते. उलट गोल किंवा त्रिकोणी पुस्तकं सांभाळणं अवघड जातं आणि वापरादरम्यान खराब होण्याची शक्यता वाढते.
प्रत्येक पुस्तक तयार करताना मोठे कागदाचे आयताकृती शीट्स वापरले जातात. त्यांना दुमडून आणि कापून पुस्तकाचे स्वरूप देणे सहज शक्य होते. जर कागदाला गोल किंवा इतर वेगळ्या आकारात कापायचे झाले, तर छपाईचा वेळ, खर्च आणि कचरा तिप्पट वाढतो.
आपण वाचन करताना डावीकडून उजवीकडे आणि वरपासून खाली असा क्रम अनुसरतो. यासाठी आयताकृती पानं सर्वात सोयीची असतात. गोल किंवा त्रिकोणी पानांवर मजकूर बसवणं अवघड असून, वाचकाचा प्रवास विस्कळीत होतो.
या मागचा इतिहास नेमका काय?
प्राचीन काळी स्क्रोल्समध्ये मजकूर लिहिला जात असे, पण ते वाचणे खूपच कठीण होते. त्यामुळे जेंव्हा ‘कोडेक्स’ म्हणजे पुस्तकांचा शोध लागला, तेव्हापासून आयताकृती स्वरूप सर्वसामान्य बनले आणि आजही तेच प्रचलित आहे.
चौरस किंवा आयताकृती पुस्तकं बांधणीसाठी, कव्हर डिझाईनसाठी आणि वितरणासाठी सर्वात सोपी असतात. प्रकाशकांच्या दृष्टिकोनातून हा आकार ‘कॉस्ट इफेक्टिव्ह’ ठरतो.
काही मुलांच्या किंवा आर्ट बुक्ससाठी गोल, हृदयाकृती किंवा त्रिकोणी पुस्तकांचे प्रयोग झाले आहेत. मात्र ही फारच अपवादात्मक उदाहरणं आहेत कारण त्यांची हाताळणी करणे फार कठीण होते.
पुस्तकांचा चौकोनी किंवा आयताकृती आकार हा केवळ सवयीचा नाही, तर तो व्यावहारिक, वैज्ञानिक आणि ऐतिहासिक गरजांमधून विकसित झालेला आहे. आणि म्हणूनच आजही, लाखो पर्यायांच्या जगातही, आपण ही पुस्तकांची जुनी पण अचूक रचना कायम ठेवतो.