नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक प्राधिकारी संघाची निवडणूक 10 डिसेंबर रोजी होणार आहे. पंधरा मतदान केंद्रांवर 560 मतदार मतदान करणार आहेत. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी विमला आर. आहेत तर निवडणूक निरीक्षक म्हणून डॉ. माधवी खोडे-चवरे आहेत.
नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघात नागपूर मनपा नगरसेवकांना मतदान करण्यासाठी नागपूर मनपा क्षेत्रामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय, नागपूर शहर तहसील कार्यालय खोली क्रमांक 2 व 4 या ठिकाणी मतदान केंद्र राहतील.
जिल्हा परिषदेच्या सदस्यांसाठी नागपूर येथील तहसील कार्यालय खोली क्रमांक 1, नरखेड, काटोल,रामटेक, मौदा, पारशिवणी उमरेड तहसील कार्यालय, नगर परिषद सावनेर व नगरपरिषद खापा येथील नगरसेवकांसाठी तहसील कार्यालय सावनेर, नगर परिषद कामठी व नगर पंचायत महादुला येथील नगरसेवकांसाठी कामठी तहसील कार्यालय, नगर परिषद कळमेश्वर ब्राह्मणी व नगरपरिषद मोहपा येथील नगरसेवकांसाठी तहसील कार्यालय कळमेश्वर, नगर परिषद कार्यालय कन्हान पिंपरी, नगरपरिषद कार्यालय बुटीबोरी ,नगरपरिषद कार्यालय वानाडोंगरी येथे मतदान केंद्र राहतील.
या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन वापरण्यात येत नाही. याठिकाणी पूर्वापार मतपत्रिका वापरण्यात येते. मतदान करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी पुरवलेले जांभळ्या रंगाचे स्केचपेन वापरावे लागतात. उमेदवाराच्या नावाच्या स्तंभ समोर पसंती क्रमांक म्हणून सर्व मतदारांना पसंती क्रमांक 1 हा आकडा एकाच उमेदवाराच्या नावापुढे लिहिणे आवश्यक आहे. या निवडणुकीमध्ये तीन उमेदवार आहेत. पण, खरी लढत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे छोटू भोयर यांच्यात आहे. त्यामुळं तीन पसंती क्रमांक देता येईल. पसंती क्रमानुसार 1, 2 व 3 असे आकड्यांमध्ये दर्शविणे आवश्यक आहे.
पालकमंत्री नितीन राऊत यांनी निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ऊर्जामंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने माजी मंत्री रमेश बंग, शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे तर शिवसेनेच्यावतीने रामटेकचे खासदार कृपाल तुमाने तसेच आमदार आशिष जयस्वाल यांना चर्चेला बोलवण्यात आले होते. शिवसेनेकडे 27 तर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 24 मतदार आहेत. काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांसोबत संपर्क साधला असल्याचे बोलले जात आहे.