खुशखबर…. नव्या वर्षात विप्रो कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवणार; 7 हजार जणांना प्रमोशन
विप्रोच्या एकूण 1.85 लाख कर्मचाऱ्यांपैकी सर्वाधिक कर्मचारी हे B3 या श्रेणीत आहेत. | Wipro

नवी दिल्ली: माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘विप्रो’ने (Wipro) नव्या वर्षात आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात घसघशीत वाढ करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार 1 जानेवारीपासून कंपनीतील कनिष्ठ पदावरील कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. तर गेल्या वर्षात चांगली कामगिरी करणाऱ्या B3 बँडमधील कर्मचाऱ्यांनाही ‘विप्रो’कडून प्रमोशन देण्यात आले आहे. (Wipro to roll out pay hikes from January 1)
विप्रो कंपनीत कर्मचाऱ्यांच्या अनुभवाच्या आधारे त्यांची A ते E अशा पाच बँडमध्ये वर्गवारी केली जाते. विप्रोच्या एकूण 1.85 लाख कर्मचाऱ्यांपैकी सर्वाधिक कर्मचारी हे B3 या श्रेणीत आहेत. विप्रोने नुकताच आपल्या कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठवला होता. यामध्ये म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटकाळात आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी उत्तम कामगिरी करून दाखविली आहे. त्यामुळे आम्ही B3 बँड आणि त्याखालील सर्व पात्र कर्मचाऱ्यांसाठी 1 जानेवारी 2021 पासून प्रभावी वेतन वृद्धी (MSI) योजना सुरु करत आहोत.
पगार नेमका किती वाढणार?
‘विप्रो’कडून C1 आणि त्यावरील श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 1 जून 2021 पासून प्रभावी वेतन वृद्धी (MSI) योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांचे वेतन नेमके किती रुपयांनी वाढवले जाणार, याविषयी ‘विप्रो’कडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तर आतापर्यंत B3 श्रेणीतील 7 हजार कर्मचाऱ्यांना प्रमोशन देण्यात आले आहे.
100 टक्के व्हेरिएबल पे मिळणार?
विप्रोने 2020-21 या आर्थिक वर्षातील तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत सर्व कर्मचाऱ्यांना 100 टक्के व्हेरिएबल पे देण्याची घोषणा केली आहे. कोरोनाच्या संकटामुळे देशातील अनेक आयटी कंपन्यांनी पगारवाढ आणि पदोन्नतीची प्रक्रिया रोखली होती. मात्र, आता अनलॉकनंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या:
दानशूर अझीम प्रेमजी! 52 हजार कोटींहून अधिक रक्कम गरिबांसाठी दान
लॉकडाऊनकाळात कर्मचारी कपात किंवा पगार कपात करु नये, हायकोर्टात जनहित याचिका
Disneyland| कोरोनाचा फटका, जगप्रसिद्ध ‘डिस्नेलँड’मध्ये 28,000 कर्मचाऱ्यांची कपात!
(Wipro to roll out pay hikes from January 1)