Aurangabad Crime: कर्णपुऱ्यात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले, अल्पवयीन मुलगी पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळसूत्र घेऊन पळणाऱ्या मुलीला रोखले. तिच्याकडून चोरी केलेले मंगळसूत्र जप्त केले. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरु आहे.
औरंगाबाद: नवरात्रानिमित्त कर्णपुरा देवीचे (Auranganad Karnpura) दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. हीच संधी साधून देवीच्या दर्शनासाठी आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून पळून जाण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे हे मंगळसूत्र चोरणारी एक अल्पवयीन मुलगी होती. बुधवारी पहाटे पाच वाजता ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमध्ये अल्पवयीन मुलांकडून भीक मागून घेण्याचे प्रकार वाढले आहेत. अशातच आता मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीत अल्पवयीन मुलांचा समावेश होणे, हा खूप गंभीर विषय ठरू शकतो.
पहाटे पाच वाजता घटना
मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरातील एक महिला आपल्या कुटुंबासोबत बुधवारी पहाटे कर्णपुरा येथे देवीच्या दर्शनासाठी पायी गेल्या होत्या. कर्णपुरा परिसरात काही अंतर पुढे जाताच तेथे भाविकांची गर्दी झाली. याच गर्दीचा फायदा घेत एका 15 वर्षीय मुलीने संबंधित महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसूत्र हिसकावले.
महिलेने आरडाओरड करताच धावले पोलीस
आपल्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची जाणीव होताच सदर महिलेने आरडाओरड सुरु केली. त्यामुळे बंदोबस्तात तैनात असलेल्या छावणी ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक वायाळ, आयुब पठाण, नागरगोजे, चव्हाण, रेड्डी आदींच्या विशेष पथकाने मंगळसूत्र घेऊन पळणाऱ्या मुलीला रोखले. तिच्याकडून चोरी केलेले मंगळसूत्र जप्त केले. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरु आहे.
घरगुती सिलिंडरचा काळाबाजार करणारा अटकेत
औरंगाबाद शहरातीलच दुसऱ्या एका घटनेत घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या एकाला पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. मुकीम करिमोद्दीन अन्सारी (42 रा. मोतीकारंजा) असे आरोपीचे नाव आहे. सोमवारी दुपारी मारलेल्या छाप्यात रेग्युलेटर, गॅस सिलिंडर, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा एक लाख तीन हजार दोनशे रुपयांचा ऐवज क्रांती चौक पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी पुरवठा तपासणी अधिकारी राजेंद्र शिंदे यांच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
इतर बातम्या-