डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना घर सोडण्यास सांगितल्यास घरमालक, हाऊसिंग सोसायटींवर कारवाई
डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी (Doctors and Health Workers) आणि इतर आरोग्य कर्मचारी यांना कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या घरमालक किंवा हाऊसिंग सोसायट्यांनी घर सोडून जाण्यास सांगतल्यास त्यांच्या विरोधात आता कारवाई होणार आहे.
मुंबई : डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी (Doctors and Health Workers) आणि इतर आरोग्य कर्मचारी यांना कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या घरमालक किंवा हाऊसिंग सोसायट्यांनी घर सोडून जाण्यास सांगतल्यास त्यांच्या विरोधात आता कारवाई होणार आहे. याबाबत सरकारने प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे.
“मानवतेच्या दृष्टीने तर हे अत्यंत चुकीचे आहेच परंतु नियमबाह्यही आहे. घरमालकांनी आणि सोसायट्यांनी आरोग्य यंत्रणेचे महत्व लक्षात घेऊन सहकार्य करावे (Doctors and Health Workers). अन्यथा साथरोग नियंत्रण कायद्यानुसार संबंधित घरमालक किंवा हाऊसिंग सोसायटीवर कारवाई करण्यात येईल”, असा इशारा सरकारने प्रसिद्धी पत्रकात दिला.
“सध्या करोना विषाणु साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील डॉक्टर, नर्सींग कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचारी अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. हे करताना त्यांना विषाणूंची बाधा होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व काळजी त्यांच्यामार्फत तसेच प्रशासनामार्फत घेतली जात आहे. त्यामुळे त्यांच्याकडून इतरांना संसर्गाचा कोणताही धोका नाही. असे असतानाही काही घरमालक, हाऊसिंग सोसायट्या त्यांच्याकडे भाड्याने राहणारे डॉक्टर, नर्सींग कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचारी यांना घर खाली करण्यास सांगत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत”, असं प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
“हे पूर्णतः चुकीचे असून संबंधीत घरमालक, हाऊसिंग सोसायट्या यांनी असे करु नये, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. एखादे घरमालक किंवा हाऊसिंग सोसायटी असे करत असल्याचे निदर्शनास आल्यास साथरोग नियंत्रण कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल”, असा इशारा देण्यात आला आहे.
“भाड्याच्या घरात राहणारे डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचारी यांना असा अनुभव आल्यास त्यांनी आपल्या क्षेत्रातील पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा”, असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.