Aurangabad Video | आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात शिवसैनिकांत बाचाबाची, औरंगाबादमध्ये काही काळ गोंधळ, खैरे ॲक्शन मोडवर!
औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. बाळासाहेब ठाकरेंचं या शहरावर विशेष प्रेम होतं. मात्र याच जिल्ह्यातील पाच आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या गटात जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे येथील शिवसेनेला तडे गेले आहेत.
औरंगाबादः युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सध्या शिवसंवाद (Shivsanvad) यात्रेदरम्यान औरंगाबादच्या दौऱ्यावर (Aurangabad) आहेत. आज पैठण येथील मेळाव्यासाठी शेकडो शिवसैनिकांची गर्दी जमली होती. आदित्य ठाकरे तेथे दाखल होताच शिवसैनिकांनी एकच गोंधळ सुरु केला. या गर्दीतून आदित्य ठाकरे मार्ग काढत जात असताना शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. कार्यकर्त्यांची भांडणं सोडवण्यासाठी गेलेल्या सुरक्षा रक्षकांवरही कार्यकर्ते भडकले. यानंतर औरंगाबाद शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी ही परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी पुढाकार घेतला. खैरे यांनी चढ्या आवाजात कार्यकर्त्यांना झापत बाजूला केले. त्यानंतर कार्यकर्त्यांमधील हे भांडण थांबले. या गोंधळामुळे आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर आदित्य ठाकरे पुढील कार्यक्रमाकडे वलाले.
आज पैठण, गंगापूर, शिर्डीत मेळावा
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सध्या महाराष्ट्रात शिवसंवाद यात्रेवर आहेत. यादरम्यान त्यांनी नाशिक, ठाणे, भिवंडी आणि त्यानंतर औरंगाबादेत शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित केले. औरंगाबादमधून पाच आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश केलाय. त्यामुळे बंडखोर आमदारांच्याच मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. काल वैजापूर, औरंगाबाद पश्चिम मतदार संघात आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांचा मेळावा घेतला तर आज पैठण, गंगापूरमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. माजी मंत्री संदिपान भूमरे यांच्या पैठण मतदार संघात सदर प्रकार घडला.
बंडखोरांविरोधात शिवसैनिक आक्रमक
औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. बाळासाहेब ठाकरेंचं या शहरावर विशेष प्रेम होतं. मात्र याच जिल्ह्यातील पाच आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या गटात जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे येथील शिवसेनेला तडे गेले आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या गटातीव शिवसैनिक तसेच उद्धव ठाकरेंच्या गटातील शिवसैनिकांमध्ये सध्या अस्वस्थतेचं वातावरण आहे. औरंगाबादेत एवढी मोठी बंडखोरी झाल्यावर आदित्य ठाकरेंच्या मेळाव्याला गर्दी जमेल का, असा प्रश्न विचारला जात होता. मात्र माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यासह तरूण शिवसैनिकांनी मेळाव्यासाठी असंख्य सभा शेकडोंना येथे खेचून आणले. त्यामुळे औरंगाबादमधील आदित्य ठाकरेंच्या मेळाव्याला कार्यकर्त्यांची तुफ्फान गर्दी पहायला मिळत आहे. त्यातच एकनाथ शिंदे गटात गेलेल्या आमदारांविरोधात काही शिवसैनिक आक्रमक झाल्याचेही चित्र पहायला मिळाले.