मुंबई : ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) या कार्यक्रमात महानायक अमिताभ बच्चन यांनी आपलं गाव बाबू पट्टीचा उल्लेख केला. बाबू पट्टीसाठी काहीतरी काम करण्याचा निश्चय अमिताभ बच्चन यांनी केला आहे (Amitabh Bachchan on Babu Patti village).
उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यातील बाबू पट्टी हे गाव अद्यापही विकासापासून वंचित आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक हरिवंशराय बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचं गाव असूनही बाबू पट्टीचे गावकरी अजूनही विकासापासून उपेक्षित आहेत. या गावात साधं शौचालयदेखील नाही (Amitabh Bachchan on Babu Patti village).
केबीसीचा मंगळवारी (20 ऑक्टोबर) प्रदर्शित झालेला एपिसोड भावनिक होता. हॉटसीटवर आलेली स्पर्धक अंकिता सिंह हीने ‘व्हिडीओ कॉल अ फ्रेंड’ या लाईफलाईनचा उपयोग करुन जौवपूरच्या नातेवाईकांना फोन केला. यावेळी तिच्या नातेवाईकांनी अमिताभ बच्चन यांना प्रश्नाचं उत्तर देण्याआधी बाबू पट्टी गावाच्या विकासासाठी काहीतरी काम करण्याची विनंती केली.
फोन स्क्रिनवर अमितभ बच्चन यांना बघून अंकिताच्या नातेवाईकांना गहिवरुन आलं. त्यांनी अमिताभ बच्चन यांना बाबू पट्टी गावाला भेट देऊन गावकऱ्यांसाठी काहीतरी चांगलं काम करावं, अशी विनंती केली. या विनंतीवर अमिताभ बच्चन यांनी स्मिथहास्य दिलं.
“माझ्या मनातदेखील बाबू पट्टी गावासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, मात्र याबाबत मी माझ्या कुटुंबीयांशीदेखील बोललो. विशेष म्हणजे योगायोग असा की, तुम्हीदेखील याच विषयावर बोलत आहात. मात्र, आम्ही नक्कीच लवकरच बाबू पट्टीसाठी काहीतरी करु”, असं अमिताभ बच्चन म्हणाले.
बाबू पट्टी गावात हरिवंशराय बच्चन यांच्या स्मृती प्रत्यर्थ एक वाचनालय उभारण्यात आलं आहे. मात्र, या वाचनालयाची अवस्थादेखील खराब आहे. गावातील अनेकांचं घर मातीचं आहे. हरिवंशराय बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्यामुळे बाबू पट्टी गावाला प्रसिद्धी मिळाली. मात्र, गावकऱ्यांना त्याचा काहीच फायदा झाला नाही.
संबंधित बातम्या :
मुलींच्या शिक्षणासाठी स्वरूपा देशपांडे ‘हॉटसीट’वर, अमिताभ बच्चन यांच्याकडून स्कॉलरशिप जाहीर!