युट्यूबवर व्हिडीओ बनवण्यासाठी घरगुती गॅस सिलेंडर रेल्वे रुळांवर
हल्ली युट्यूब, फेसबूक, इंस्ट्राग्राम यासह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पैसे कमवण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. युट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवण्यासाठी एका विकृताने चक्क रेल्वे रुळांवर घरगुती गॅसचा सिलेंडर ठेवला.
हैद्राबाद : हल्ली युट्यूब, फेसबूक, इंस्ट्राग्राम यासह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पैसे कमवण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. युट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवण्यासाठी एका विकृताने चक्क रेल्वे रुळांवर घरगुती गॅसचा सिलेंडर ठेवला. धक्कादायक म्हणजे लोकांच्या जीवाची पर्वा न करता युट्यूबवर व्हिडीओ बनवण्यासाठी त्याने हे सर्व केल्याचे उघड झाले आहे. आंध्रप्रदेशमधील तिरुपतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
रामी रेड्डी असे या व्यक्तीचे नाव आहे. रामी रेड्डीने युट्यूबर पैसे कमवण्यासाठी गॅस सिलेंडर चालत्या ट्रेनच्या समोर ठेवला. त्यानंतर त्याने अॅनिमेशनच्या माध्यमातून ट्रेनची सिलेंडरला धडक देतानाच एक व्हिडीओ बनवला. तो व्हिडीओ त्याने युट्यूबवर अपलोडही केला.
रेल्वे पोलिसांनी याबाबतचा व्हिडीओ बघितल्यानंतर त्यांनी तात्काळ रामी रेड्डी याला तात्काळ अटक केली. त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून बाईक आणि गॅस सिंलेडर जप्त केले आहे.
तिरुपतीमध्ये एरपेडू मंडलमधील चेल्लूरु गावात राहणारा रामी रेड्डी गेल्या काही दिवसांपासून रेल्वेच्या रुळांवर फटाके, टायर्स, गॅस सिलेंडर आणि बाईक इत्यादी गोष्टी ठेवत होता. त्यावरुन ट्रेन गेल्यानंतर तो त्याचा व्हिडीओ काढायचा. त्यानंतर त्याचं अॅनिमेशन करुन सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करत होता.
युट्यूबवरुन पैसे कमवण्यासाठी मी अशाप्रकारे व्हिडीओ बनवायचो. लोकांना अशाप्रकारचे व्हिडीओ फार आवडतात. त्यामुळे मी असे व्हिडीओ तयार करतो. पण असे व्हिडीओ बनवणे गुन्हा असल्याचे मला माहित नव्हते, असं रामी रेड्डीने सांगितलं.