आशिष शेलारांची जीभ घसरली, मुख्यमंत्र्यांविरोधात एकेरी शब्दात टीका
भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकेरी शब्दात टीका केली आहे.
मुंबई : “नागरिकत्व दुरुस्ती कायदा महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही”, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्यांच्या याच विधानावर भाजप नेते आणि माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकेरी भाषा वापरत टीका केली (Ashish Shelar slams CM Uddhav Thackeray). “हा कायदा केंद्राचा आहे. कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का?”, असा घणाघात शेलारांनी केला.
आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबतच्या भूमिकेवरही टीका केली. “शिवसेना सध्या एवढे रंग बदलत आहे की रंग बदलणारा सरडाही आत्महत्या करेल”, असे टीकास्त्र शेलारांनी सोडलं. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वसई जनता सहकारी बँकेचे माजी संचालक सुरेश जोशी यांच्या स्मृत्तीदिनानिमित्त नालासोपाऱ्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ‘भारतीय विद्यार्थी चळवळ दशा आणि दिशा’ या विषयावर बोलताना आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली (Ashish Shelar slams CM Uddhav Thackeray).
“नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी या कायद्यांविरोधात मुस्लिम समाजाच्या तरुण विद्यार्थ्यांनी मुंबईत एक आंदोलन उभं केलं आहे. काही दिवसांपूर्वी (नाव न घेता) एक युवा नेता गेट वे ऑफ इंडिया येथील आंदोलनात सहभागी झाला होता. त्यावेळी फक्त सरकारविरोधीच नाही, तर देशाविरोधात घोषणा देण्यात आल्या होत्या. या आंदोलनस्थळी राष्ट्रवादीचे नेते गेले आणि त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष कोण? गृह मंत्री कुणाचे? असे असतानाही राज्यात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मोठा कट रचला जात आहे आणि हा कट यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या आजूबाजूला फिरत आहे”, असा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला.