नवी दिल्ली : निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अशोक लवासा यांना जानेवारी 2018 मध्ये निवडणूक आयुक्तपदी नियुक्त करण्यात आलं होतं. मात्र, त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पदाचा राजीनामा दिला आहे (Ashok Lavasa resign as Election commissioner).
अशोक लवासा 1 सप्टेंबरपासून आशियाई विकास बँकेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. आशियाई विकास बँकेचे सध्याचे उपाध्यक्ष दिवाकर गुप्ता यांचा कार्यकाळ येत्या 31 ऑगस्टला संपणार आहे. त्यांच्या जागेवर अशोक लवासा बँकेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत (Ashok Lavasa resign as Election commissioner).
हेही वाचा : श्वसनासंबंधी 20 आजारांसाठी मोफत उपचार, शुल्क आकारल्यास हॉस्पिटलला पाचपट दंड, राजेश टोपेंच्या सूचना
निवडणूक आयोगाच्या इतिहासात कार्यकाळाअगोदर आपल्या पदाचा राजीनामा देणारे अशोक लवासा हे दुसरे निवडणूक आयुक्त ठरले आहेत. अशोक लवासा यांच्याआधी 1973 साली नागेंद्र सिंह यांनी मुख्य निवडणूकपदाचा राजीनामा दिला होता. नागेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले होते.
अशोक लवासा यांनी निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा दिला नसता तर 2021 साली त्यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी वर्णी लागण्याची शक्यता होती. त्यामुळे 2022 साली होणाऱ्या उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंडसह इतर राज्यांच्या निवडणुका त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या असत्या.
अशोक लवासा यांनी ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठातून एमबीएचं शिक्षण घेतलं आहे. तर मद्रास विद्यापीठातून एमफिल डिग्री मिळवली. त्यांनी दिल्ली विद्यापीठातही इंग्रजी साहित्याशी संबंधित शिक्षण घेतलं आहे. अशोक लवासा यांनी याआधीदेखील अनेक वरिष्ठ पदांची जबाबदारी सांभाळली आहे.