यळकोट यळकोट जय मल्हार.. सातारा गावातलं मंदिर ते कडेपठार, दुमदुमला जयघोष, औरंगाबादेत खंडोबा यात्रेचा उत्साह!
गावातील चिंचोळ्या रस्त्यापासून, डोंगराचे खडकाळ रस्ते यातून वाट काढत तब्बल 15 किलोमीटर पायी जाणाऱ्या भाविकांमध्ये यात्रेचा उत्साह दिसून आला. सनई-चौघड्यांच्या गजरात यावेळी भक्तांनी यळकोट यळकोट जय मल्हार असा जयघोष केला.
औरंगाबादः सातारा गावापासून 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या कडेपठार खंडोबा मंदिर (Khandoba Temple) पौष यात्रेनिमित्त काल भाविकांनी गजबजलं होतं. सातारा येथील मुख्य गावातील हेमाडपंथी पुरातन खंडोबा मंदिर आणि दांडेकर यांच्या वाड्यापासून कडेपठार डोंगरावरील मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची यात्रा निघाली होती. गावातील चिंचोळ्या रस्त्यापासून, डोंगराचे खडकाळ रस्ते यातून वाट काढत तब्बल 15 किलोमीटर पायी जाणाऱ्या भाविकांमध्ये उत्साह दिसून येत होता. सनई-चौघड्यांच्या गजरात यावेळी भक्तांनी यळकोट यळकोट जय मल्हार असा जयघोष केला.
काय आहे परंपरा?
खंडोबाची देशात 18 देवस्थानं आहेत. त्यापैकी सातवे स्थान हे श्री क्षेत्र खंडोबा कडेपठार आहे. खंडोबाच्या वर्षभरातून चार यात्रा होतात. चैत्री, पैषी, श्रावणी आणि माघी अशा या चार यात्रा असतात. मराठवाडा, खान्देश आणि विदर्भातील भाविकांसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील सातारा गावातील खंडोबाचे देवस्थान लोकप्रिय आहे. औरंगाबादमधील हे ठिकाण सातारा गावापासून 9 किलोमीटर अंतरावर आहे. सातारा गावातील हेमाडपंती मंदिर बांधण्याआधीही मूळ मंदिर हे कडेपठार येथे आहे. यावेळी गावातील खंडोबा मंदिरातून खंडेरायाची पालखीत वाजत गाजत मिरवणूक निघते. पौषातील रविवारी सातारा गावातील खंडोबा मंदिरात आरती झाल्यानंतर सकाळी 9 वाजता पालखी कडेपठार डोंगराकडे निघते. वाजतगाजत,‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष करत 11 वाजता कडेपठार येथे काल पालखी पोहोचली. तेथे श्रींचा अभिषेक झाल्यानंतर नवीन वस्त्रे परिधान करण्यात आले. त्यानंतर महाआरती करण्यात येऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
आमदार शिरसाट यांच्या हस्ते महाआरती
यात्रेनिमित्त कडेपठारावरील हेमाडपंथी मंदिरावर अतिशय सुंदर अशी सजावट करण्यात आली होती. आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते मंदिरात महाआरती करण्यात आली. तसेच विजया शिरसाट, हर्षदा शिरसाट, तुषार शिरसाट, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, नरेंद्र जबिंदा, उपजिल्हाप्रमुख आनंद तांदूळवाडीकर, सरपंच गणेश वाघ, सुखदेव बनकर, बंडू वाघचौरे, संदीप देवरे, सुरेश बाहुले, संदीप रणजित ढेपे, कोसडीकर, ज्योतिराम पाटील, अजय चोपडे, मनोज सोनवणे, प्रवीण जाधव, सूरज शिंदे, अमर सभादिंडे, किरण देवकाते, आशिष दांडेकर, महेश थोरात, रणजित पवार, संतोष जाटवे, मनोज धोपटे, गणेश देवकाते, कैलास पाटील तसेच मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती.
इतर बातम्या-