औरंगबाादच्या क्रांती चौकातील ध्वज आता वर्षभर फडकणार, 210 फुट उंच ध्वजस्तंभ, काय होत्या अडचणी?
क्रांतीचौकातील ध्वजस्तंभ 210 फुटांचा असून येत्या 26 जानेवारी रोजी येथे ध्वजवंदन होणार असून पुढील 365 दिवस हा ध्वज फडकत राहिल, असा निर्णय घेण्यात आला आहे.
औरंगाबादः शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या क्रांती चौक (Aurangabad kranti Chauk) परिसरात उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभावरील तिरंगा ध्वज आतापर्यंत पर्षातून पाच दिवसत फडकवला जात होता. मात्र आता तो वर्षभर फडकवला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून (Collector Office) देण्यात आली आहे. क्रांतीचौकातील ध्वजस्तंभ 210 फुटांचा असून येत्या 26 जानेवारी रोजी येथे ध्वजवंदन होणार असून पुढील 365 दिवस हा ध्वज फडकत राहिल, असे सांगण्यात आले आहे.
काय होती अडचण?
शहरात क्रांती चौक आणि चिकलठाणा विमानतळ या भागात दोन ठिकाणी उंच तिरंगा ध्वज स्तंभ आहेत. विमानतळापेक्षा क्रांती चौकातील झाशीची राणी उद्यानातील ध्वजाची उंची अधिक आहे. या ध्वजाची उंची 210 फूट एवढी असून त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम आतापर्यंत CMIA उद्योजक संघटनेद्वारे केले जात होते. मात्र यासाठीचा खर्च वर्षभरातून एक लाखाहून अधिक येतो. तर ध्वजासाठीचा खर्च 90 हजार रुपये एवढा येतो. ध्वजस्तंभ उभारल्यानंतर तो नियमितपणे फडकवला जात होता. मात्र स्तंभाची उंची अधिक असल्याने वरील बाजूस हवेचा वेग जास्त असतो. त्यामुळे ध्वजाचे कापड सतत फाटणे, उडून जाणे अशा घटना घडू लागल्या. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने हा ध्वज वर्षातून केवळ पाच दिवसच फडकवला जात होता.
पाच दिवस ध्वज फडकवला जात होता
क्रांती चौकातील हा ध्वज आतापर्यंत 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट, 17 सप्टेंबर आणि दिवाळीचा सण अशा पाच महत्त्वाच्या दिवशीच फडकवला जात होता. मात्र आता यापुढे तो वर्षभर फडकवला जाणार असल्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. येत्या 26 जानेवारीपासून याची सुरुवात होईल. सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ध्वज समिती आणि उद्योजक, व्यापारी, सेवाभावी संस्थांच्या पदाधिकार्यांची बैठक पार पडली. त्यात उद्योजकांना ध्वजासाठी सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. त्यावर सर्वांनी सहमती दर्शवली. ध्वजासाठी प्रत्येकांनी निधी देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे येत्या 26 जानेवारीपासून वर्षभर हा ध्वज फडकवला जाईल.
इतर बातम्या-