औरंगाबादः महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठीच्या दृष्टीने प्रभागांची रचना कशी असेल, नगरसेवक किती असतील, यासंबंधीच्या निर्णय प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. काम मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबादमधील नगरसेवकांची (Aurangabad corporators) संख्या 17 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे 2021 या वर्षात जनगणना झाली नसली तरीही लोकसंख्या आणि मतदार वाढले आहेतच. त्यामुळे राज्य मंत्रीमंडळाने सर्वच महापालिकांमध्ये 17 टक्के नगरसेवक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार औरंगाबादच्या महापालिकेत (Aurangabad corporation) आता 115 ऐवजी 126 नगरसेवक असतील. तसेच प्रभागांची संख्याही 38 वरून 42 पर्यंत जाईल.
वाळूजजवळील सिडकोची महानगरे औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत घेण्याच्याही हालचाली सुरू आहेत. दोन आठवड्यांत त्यावरही मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होईल. तसे झाल्यास नगरसेवक, प्रभागांची संख्याही वाढेल. पण हद्दवाढीविरोधात याचिका दाखल झाल्यास मनपा निवडणूक आणखी पुढे ढकलली जाऊ शकते. नगरसेवकांची संख्या वाढल्याने स्वीकृत सदस्य संख्याही पाचवरून सहा होण्याची शक्यता आहे. प्रभाग हद्दी, आरक्षणही नव्याने ठरवावे लागेल. त्यावर आक्षेप दाखल होऊन पुन्हा कोर्टात प्रकरण जाऊ शकते. त्यामुळे किमान एप्रिलपर्यंत निवडणूक लांबेल, अशी चिन्हे आहेत.
या नव्या निर्णयामुळे गेल्या दोन वर्षांपासून निवडणुकीची तयारी करणाऱ्या नवख्या इच्छुकांसमोर पुन्हा आरक्षण, हद्दवाढीसाठी लढाई करण्याचे संकट उभे राहणार आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या या निर्णयाचे एमआयएमने स्वागत केले आहे. ‘शहर वाढते आहे, त्यामुळे लोकप्रतिनिधींची संख्याही वाढायला हवी’ असे मत खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले, तर भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी ‘निवडणुका पुढे ढकलण्यासाठी सत्ताधाऱ्यांची ही खेळी आहे,’ अशी टीका केली.
इतर बातम्या
Aurangabad: ढासळलेल्या मेहमूद दरवाज्याच्या संवर्धनासाठी नव्याने निविदा, 38 लाख रुपये खर्च करणार
औरंगाबाद विमानतळावरही खासगीकरणाचे वारे, सोयी- सुविधा, प्रवासी संख्येची सविस्तर माहिती मागवली