पत्नीच्या पोटातल्या बाळाची शपथ घेतो, निर्दोषाचा आक्रोश, औरंगाबादचे पोलीसही हळहळले, मालकाने मागितली माफी
निर्दोष सिद्ध केल्यानंतर गुडीवाल हे पत्नीला घेवून पोलीस स्टेशनमध्ये आले आणि या तपासाबद्दल आभार मानले. चोरीचा आरोप असल्याने गुडीवाल यांची दिवाळीही खूप तणावाखाली गेली. पण पोलिसांच्या सहकार्यामुळे कायद्यावरचा विश्वासही अधिक दृढ झाल्याचे गुडिवाल यांनी सांगितले. सध्या परदेशात असलेले एजन्सी मालक पांडे यांनीदेखील गुडीवाल यांची फोनवर माफी मागितल्याचे पोलिसांनी सांगितले.
औरंगाबादः शहरातील एका गॅस एजन्सीचे (Aurangabad city) 3 लाख 51 हजार रुपये घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्याला आरोपींनी रस्त्यात लुटले. परंतु एजन्सी मालकाला कर्मचाऱ्यावरच संशय आला. त्याने कर्मचाऱ्याविरुद्ध पोलिसात (CIDCO Police Station) तक्रार दाखल गेली. त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. आपण पैसे घेतले नसल्याचे कर्मचारी आक्रोश करून सांगत होता. एवढा भावनिक प्रकार पाहून पोलिसही हळहळले. या प्रकरणाचा सखोल तपास त्यांनी केला. त्यानंतर सहा आरोपींना अटकही करण्यात आली. अखेर मालकालाही कर्मचाऱ्याची माफी मागावी लागली.
22 ऑक्टोबरला झाली होती चोरी
सिडको एन-३ भागात राहणारे आदित्य कमलकांत पांडे यांची हर्सूल टी पॉइंट येथे आदित्य भारत गॅस एजन्सी आहे. त्यांच्याकडे 22 डिलिव्हरी बॉय आणि हेमंत सुंदरलाल गुडीवाल हे कॅशियर म्हणून सात-आठ वर्षांपासून काम करतात. 22 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता हेमंत नेहमीप्रमाणे दिवसभर जमा झालेले 3 लाख 51 हजार 190 रुपये घेऊन मालकाच्या घरी देण्यासाठी जात होते. मात्र आंबेडकरनगरजवळ काही आरोपींनी त्यांच्या हातावर रॉड मारून पैशांची बॅग पळवली. गुडीवाल यांनी एजन्सीचे मालक पांडे यांना तत्काळ फोन करून हा प्रकार सांगितला. 23 ऑक्टोबर रोजी पांडे शहरात आले, त्यांनी हेमंतकडे विचारपूस केली. त्याने दिलेल्या उत्तरांवर पांडे समाधानी नव्हते. त्यानेच पैसे लाटल्याचा आरोप पांडे यांनी केला. तशी तक्रार सिडको पोलिसांकडे दाखल केली.
पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्याचा टाहो
पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवले असता हेमंत गुडीवालने पोलिसांना ही खरोखरची लूटमार झाल्याचे सांगितले. पोलिसांचा विश्वास बसत नव्हता त्याने, गर्भवती पत्नीच्या पोटावर हात ठेवून भावनिक होऊन म्हटले, ‘साहेब, होणाऱ्या बाळाची शपथ घातो, गरीब असलो तरी कोणाचे पैसे नाही चोरणार…’ असे म्हणत तो ढसाढसा रडला. हे पाहून पोलीसही हळहळले. त्यांनी सखोल तपास केला असता कर्मचाऱ्याची खरोखरच लूटमार झाल्याचे समोर आले.
सीसीटीव्ही फुटेजमध्येही चोरटे कैद नव्हते
या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजमध्येही चोरटे कैद नव्हते. पोलिसांच्या पथकाने सर्व गुन्हेगारांकडे चौकशी केली असता खबरे सक्रिय केले. तेव्हा दोन तरुणांकडे अचानक जुगार खेळण्यासाठी पैसे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी तत्काळ तपास सुरु केला. हे दोन तरुण याच एजन्सीमध्ये काही काळापूर्वी कामाला होते. त्यांनी इतर चार साथीदारांच्या मदतीने ही लूटमार घडवून आणल्याचे कळले. आपल्याला निर्दोष सिद्ध केल्यानंतर गुडीवाल हे पत्नीला घेवून पोलीस स्टेशनमध्ये आले आणि या तपासाबद्दल आभार मानले. चोरीचा आरोप असल्याने गुडीवाल यांची दिवाळीही खूप तणावाखाली गेली. पण पोलिसांच्या सहकार्यामुळे कायद्यावरचा विश्वासही अधिक दृढ झाल्याचे गुडिवाल यांनी सांगितले. सध्या परदेशात असलेले एजन्सी मालक पांडे यांनीदेखील गुडीवाल यांची फोनवर माफी मागितल्याचे पोलिसांनी सांगितले.
इतर बातम्या-
‘रंग दे बसंती’ ची कथा चोरल्याच्या आरोपातून दिग्दर्शक राकेश मेहरा दोषमुक्त, औरंगाबाद कोर्टाचा निकाल
भीषण अपघात, सळई घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला इंडिका धडकली, औरंगाबादमधील फुलंब्रीत अपघात, एक ठार