औरंगाबादः जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी (Aurangabad collector) कठोर नियमावली लागू केली आहे. या नियमांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईदेखील केली जात आहे. कोरोना लसीचे प्रमाणपत्र (Corona Vaccination) नसलेल्या नागरिकांना पेट्रोल, रेशन न देण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांनी दिले आहेत. मात्र अनेक पेट्रोल पंप या आदेशाकडे दुर्लक्ष करत आहेत. जिल्हाधिकारी रविवारी संध्याकाळी स्वतः बाबा पेट्रोलपंपासमोर येऊन थांबले, तेव्हा अर्ध्या तासात एकालाही प्रमाणपत्र विचारले नाही. हे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी थेट हा पंप सील करण्याचे आदेश पुरवठा विभागाला दिले.
09 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणाचे प्रमाणपत्र नसणाऱ्या नागरिकांना पेट्रोल, डिझेल, रेशन अशा सुविधा नाकारण्याचे आवाहन व्यावसायिकांना केले आहे. तसेच विविध पर्यटन स्थळांवरदेखील लसीचे प्रमाणपत्र नसलेल्यांना तिकिट दिले जाणार नाही तसेच प्रवेशद्वारातून प्रवेश मिळणार नाही, असे आदेश दिले होते. मात्र अद्याप हा आदेश गांभीर्याने घेतला जात नसल्याचे दिसून येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात काल कठोर कारवाई केली. लसीकरण प्रमाणपत्राची तपासणी न केल्यामुळे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सोनाली जोंधळे व जिल्हा पुरवठा निरीक्षक राजेंद्र शिंदे यांनी रात्री 8.30 वाजता बाबा पेट्रोल पंप सील केला.
शहरातील एका पेट्रोलपंपावर कारवाई झाल्यामुळे इतर पेट्रोल पंपांनी यातून धडा घ्यावा, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. तसेच ज्यांनी लस घेतली नाही, त्यांना पंपावरच लस देण्याची व्यवस्था करा, अशी विनंती पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. मात्र आता पेट्रोल पंपावर कारवाई होत असल्यामुळे लस न घेणाऱ्यांना पेट्रोल मिळणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
इतर बातम्या-