बंजारा समाजाचे धर्मगुरु रामराव महाराजांवर रविवारी दुपारी अंत्यसंस्कार; पोहरादेवीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त
संत सेवालाल महाराजांचे वंशज आणि बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांच्या पार्थिवावर रविवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
वाशिम: संत सेवालाल महाराजांचे वंशज आणि बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ. रामराव महाराज यांच्या पार्थिवावर रविवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. रामराव महाराजांच्या अंत्यविधीला देशभरातून हजारो अनुयायी येण्याची शक्यता असल्याने पोहरादेवी आणि इतर जिल्ह्यातून येणारे सर्व रस्ते सील करण्यात आले असून पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. (Banjara community religious leader Ramrao Maharajs funeral on sunday)
शनिवारी रात्री ११ वाजता डॉ. रामराव महाराज यांचे मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव वाशिमच्या मालेगाव येथे आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मूळगावी पोहरादेवी येथे त्यांचे पार्थिव आणण्यात आले. त्यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी एकच गर्दी झाली. त्यापूर्वी गावागवात भाविकांनी रांगोळी काढत रस्त्यांच्या दोन्ही बाजूने दिवे प्रज्वलीत करून महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच आज विश्वस्त मंडळ, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि राज्याचे मंत्री संजय राठोड यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर रामराव महाराज यांच्या पार्थिवावर उद्या रविवारी दुपारी 12.30 वाजता अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आज संध्याकाळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पोहरादेवी येथे येऊन महाराजांचे अंतिम दर्शन घेतले. महाराजांची शिकवण, आशीर्वाद आणि प्रेरणा कायम आपल्यासोबत राहील, अशा शब्दांत चव्हाण यांनी शोक व्यक्त केला. देशाच्या कानाकोपऱ्यात महाराजांचे लाखो अनुयायी असून ते बंजारा समाजाचे शक्तिस्थान होते. त्यांच्या निधनामुळे आज प्रत्येक वाडी-तांड्यावर शोककळा पसरली आहे. संत सेवालाल महाराज यांचा वारसा त्यांनी समर्थपणे चालवला होता. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, महिला अत्याचार, हुंडाबळी, अनिष्ट प्रथा व रूढींचे उच्चाटन आदींबाबत त्यांनी जनजागरणाचे मोठे कार्य केले. वाडी-तांड्यावर राहणाऱ्या बंजारा समाजाची प्रगती करायची असेल तर समाज शिक्षित झाला पाहिजे, त्यांच्यावर नव्या विचारांचे संस्कार झाले पाहिजे, ही भूमिका मांडून त्यांनी शिक्षणाचा प्रचार-प्रसार केला व बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले. त्यांचे कार्य केवळ बंजारा समाजापुरते मर्यादित नव्हते; तर इतर समाजांसाठीही ते प्रेरणास्थान होते. डॉ. रामरावजी महाराज यांचे चव्हाण कुटुंबाशी डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या काळापासून जिव्हाळ्याचे नाते होते. ते आमचे मार्गदर्शक होते व त्यांचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी होता. त्यांच्या दर्शनानंतर नेहमी एका वेगळ्याच समाधानाची अनुभूती होत असे. त्यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे, या शब्दांत चव्हाण यांनी भावना व्यक्त केल्या. तर, महाराजांनी समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी काम केलं. पोहरादेवी विकासकामाचा आराखडा मंजूर करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या जाण्याने केवळ बंजारा समाजाचेच नव्हे तर मानवतेचे नुकसान झाले आहे, अशी भावना राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.
पोहरादेवी येथे बंजारा समाजचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची समाधी आहे. संत सेवालाल यांचे वंशज असल्याने रामरावबापू महाराज यांच्यावर बंजारा समाजाची अपार श्रध्दा होती. इतरही समाजात त्यांना मान होता. मागील वर्षभरापासून त्यांना प्रकृती साथ देत नसल्याने मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. कोजागिरी पौर्णिमेला रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने शोक व्यक्त होत आहे. बंजारा समाजचे धर्मगुरू असल्याने अंत्यसंस्काराला पोहरादेवी येथे भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. येथे कुणीही गर्दी करू नये, असे आवाहन वनमंत्री संजय राठोड यांनी केले आहे. (Banjara community religious leader Ramrao Maharajs funeral on sunday)
अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी: मोदी
रामराव महाराजांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. रामराव बापू महाराज यांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचलं. गरीब आणि वंचित समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. काही महिन्याआधीच मला त्यांना भेटण्याचं भाग्य लाभलं. त्यांच्या निधनामुळे अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असं मोदींनी शोकसंदेशात म्हटलं आहे.
Shri Ramrao Bapu Maharaj Ji will be remembered for his service to society and rich spiritual knowledge. He worked tirelessly to alleviate poverty and human suffering. I had the honour of meeting him a few months ago. In this sad hour, my thoughts are with his devotees. Om Shanti. pic.twitter.com/o1LjExjSWH
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2020
महाराजांच्या जाण्याने सर्वांचीच हानी: शहा
थोर समाजसुधारक आणि धार्मिक गुरु रामराव महाराज यांच्या निधनाने आपल्या सर्वांचंच मोठं नुकसान झालं आहे. गरीब आणि शोषितांच्या उत्कर्षासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांच्या कार्यामुळे ते नेहमीच स्मरणात राहतील, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे.
Demise of social reformer and spiritual guru Shri Ramrao Bapu Maharaj is a huge loss for all of us. His entire life was dedicated towards the upliftment of the poor and downtrodden, he will always be remembered for his noble works. My condolences are with his devotees. Om Shanti
— Amit Shah (@AmitShah) October 31, 2020
संबंधित बातम्या:
देशभरातील बंजारा समाजावर शोककळा, धर्मगुरु संत रामराव महाराजांचे निधन
(Banjara community religious leader Ramrao Maharajs funeral on sunday)