Bata | ‘बाटा’च्या जागतिक नेतृत्वाची जबाबदारी पहिल्यांदाच भारतीयाच्या खांद्यावर, संदीप कटारिया नवे सीईओ
125 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच 'बाटा शू ऑर्गनायझेशन'च्या नेतृत्वाची धुरा भारतीयाला मिळाली आहे
मुंबई : ‘बाटा शू ऑर्गनायझेशन’च्या (Bata Shoe Organization) मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पहिल्यांदाच भारतीयाची वर्णी लागली आहे. चप्पल निर्मिती आणि विक्री क्षेत्रात जागतिक कीर्तीच्या ‘बाटा’ कंपनीने संदीप कटारिया (Sandeep Kataria) यांच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. 125 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच बाटाच्या ग्लोबल नेतृत्वाची धुरा भारतीयाला मिळाली आहे. गेल्या पाच वर्षांपासून अॅलेक्सिस नासर्ड (Alexis Nasard) सीईओपद सांभाळत होते. (Bata Shoe Organization announces the appointment of Sandeep Kataria as CEO)
“बाटा इंडिया लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कटारिया यांनी सातत्याने कंपनीचा विस्तार आणि नफा वाढवण्यात मदत केली आहे. त्यांच्या नेतृत्वात बाटा इंडियाने दुप्पट नफा कमवला. ‘सरप्राईजिंगली बाटा’ यासारख्या अत्यंत कल्पक मोहिमांचे ते जनक होते. त्यांनी तरुण ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवत अधिक उत्साही आणि नव्या दमाचा ब्रँड म्हणून बाटाची प्रतिमा सुधारली” असं बाटाने सांगितलं.
1984 मध्ये स्थापन झालेली बाटा कंपनी दरवर्षी 18 कोटींपेक्षा जास्त पादत्राणांची विक्री करते. सत्तर देशांमधील 5,800 स्टोअर्समध्ये 35,००० कामगार कार्यरत आहेत. भारतात, बाटा दरवर्षी सुमारे 5 कोटी शूजची विक्री होते. तर दररोज 1 लाख 20 हजारांहून अधिक ग्राहक दुकानांना भेटी देतात, असे बाटाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
“सध्या सुरु असलेल्या कोरोना साथीच्या प्रादुर्भावानंतरही बाटा कंपनीच्या भविष्यातील सकारात्मक वाटचालीबद्दल मला विश्वास वाटतो. नवीन जबाबदारी स्वीकारताना मला पुढच्या प्रवासाबद्दल अत्यंत उत्साह वाटतो. बाटा हा एक ब्रँड आहे, जो उच्च गुणवत्ता आणि स्वस्त पादत्राणांसाठी प्रतिष्ठित मानला जातो. मला बाटाच्या भारतातील यशाचा भाग होण्याचा बहुमान मिळाला. 2020 मध्ये असामान्य आव्हानांना आपण सामोरे गेलो. परंतु 125 वर्षांचा इतिहास लाभलेल्या कंपनीला अभिमानाने आणखी पुढे नेण्याची मी आशा करतो” अशी प्रतिक्रिया संदीप कटारिया यांनी व्यक्त केली.
गेल्या काही वर्षांमध्ये, बाटा इंडियाने फूटवेअरची संख्या, कमाई आणि नफ्यात अपवादात्मक वाढ केली आहे. अत्यंत स्पर्धात्मक अशा फूटवेअर मार्केटमध्ये बाटाच्या ग्राहकांसाठी उत्तम पर्याय दिले आहेत. संदीप कटारिया यांच्या व्यापक अनुभवाचा फायदा बाटा ग्रुप आणि बाटा इंडिया दोघांनाही मिळाला आहे, अशा शब्दात बाटा इंडियाचे अध्यक्ष अश्वनी विंडलास यांनी कौतुक केलं.
संबंधित बातम्या :
शूज घेतल्यानंतर पिशवीचे पैसे आकारले, बाटाला 9 हजार रुपयांचा दंड
(Bata Shoe Organization announces the appointment of Sandeep Kataria as CEO)