पायलट होण्याचं स्वप्न अधुरं, बिहारच्या पठ्ठ्याने नॅनोचं केलं हेलिकॉप्टर!
पायलट होण्याच्या स्वप्नाने झपाटलेल्या बिहारमधील तरुणाने आपल्या नॅनो कारचं रुपांतर थेट हेलिकॉप्टरमध्ये केलं
पाटणा : वैमानिक होण्याचं स्वप्न अधुरं राहिल्याने बिहार (Bihar) मधील एका तरुणाने अनोखी ‘आयडियाची कल्पना’ लढवली. आपल्या ‘टाटा नॅनो’ कार (Tata Nano Car) चं रुपांतर त्याने एका हेलिकॉप्टर (Helicopter) मध्ये केलं. अर्थात स्वप्नाच्या पंखांनी त्याने ही झेप घेतली असली, तरी त्याची कार प्रत्यक्षात आकाशात उडू शकत नाही.
बिहारमधील छपरा गावात राहणाऱ्या मिथिलेश प्रसाद (Mithilesh Prasad) याला लहानपणापासूनच आकाशात उडाणाऱ्या विमानांचं आकर्षण होतं. एक दिवस आपणही वैमानिक व्हायचं, असं स्वप्न त्याने उराशी बाळगलं. आपल्या स्वप्नांचा मागोवा घेताना काही अडचणी आल्या आणि पायलट होण्याचं स्वप्न मात्र अधुरं राहिलं.
नियतीपुढे हार मानेल, तर तो मिथिलेश प्रसाद कसला ! त्याने आपल्या नॅनो गाडीलाच हेलिकॉप्टरचा रंग दिला. गाडीचं रुपांतर हुबेहूब हेलिकॉप्टरमध्ये करण्यात त्याने कोणतीच कसर ठेवलेली नाही. अंतर्गत रचना बदलण्यापासून हेलिकॉप्टरप्रमाणे शेपूट, पंखा अशा सर्व गोष्टी त्याने केल्या. आपल्या गाडीला त्याने हेलिकॉप्टरप्रमाणेही रंगही दिला.
आता त्याचीही ‘हवाई कार’ आकाशात उडू शकत नाही, हे त्याचं दुर्दैवच. बिहारमधील रस्त्यांवर मात्र तो आपली आलिशान हेलिकॉप्टर कार थाटात मिरवतो.
बिहारचा हा पठ्ठ्या कारला हेलिकॉप्टरचं रुप देणारा जगातला पहिलाच युवक नाही. चीनमधल्या एका शेतकऱ्यानेही अशीच प्रतिकृती निर्माण केली होती. त्यावर त्याने तीन लाख 74 हजार यूएस डॉलर (अंदाजे दोन कोटी 63 लाख रुपये) खर्च केले होते. पाकिस्तानातील एका पॉपकॉर्न विक्रेत्यानेही घरगुती विमान बांधलं होतं. हे करण्यासाठी त्याला कर्ज, जमिनीची विक्री असे उपद्व्याप करुन 90 हजार रुपये उभे करावे लागले होते.