एकनाथ खडसे खरंच भाजपात घरवापसी करणार? गिरीश महाजन यांचं सूचक वक्तव्य
"त्यांच्याविषय पक्षाचं जे मत असेल तेच माझं मत असेल. मी पक्षाच्या काही विरोधात नाही. पक्षाच ठरवत असेल तर विरोध करण्याच काही कारण नाही. मी तर जुना कार्यकर्ता आहे पक्षाने जर ठरवलं तर ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही", अशी भूमिका गिरीश महाजन यांनी खडसेंच्या प्रश्नावर मांडली.
किशोर पाटील, Tv9 प्रतिनिधी, जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही भाजपात परतणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. याच मुद्द्यावरुन भाजप नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना डिवचलं आहे. पण तरीही त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. “ज्या पक्षाने आपल्याला आमदार केलं. त्याच पक्षाला विश्वासात घेऊन दुसऱ्या पक्षात जाईल, असं त्यांचं म्हणणं योग्य आहे का? हे तर काहीही झालं. चांगलं आहे. भेटीगाठी होत असतात. तुम्ही कुठेही राष्ट्रीय स्वयंसेवक नव्हता किंवा भाजप पक्ष संघटन वाढीसाठी काम करत नव्हता. तुम्ही पहिल्यांदा पक्षात आले आणि पक्षाने तुम्हाला आमदार केलं. पक्षामुळे तुम्ही सहा टर्म आमदार झाला. पंधरा वर्ष लाल दिव्याची गाडी दिली. आणखी काय दिलं पाहिजे पक्षाने तुम्हाला? जर तुम्हाला सगळे ओळखतात, तुमचे मोदी, शाह आणि जे. पी. नड्डा यांच्याशी चांगले संबंध आहेत. तर एवढे वाईट दिवस त्यांच्यावर का आले? माझा हा सुद्धा प्रश्न आहे”, असं गिरीश महाजन म्हणाले.
“पक्षश्रेष्ठी आम्हाला त्यांच्याबद्दल काही विचारलं तर आम्ही सांगू. पण ते म्हणतायेत आमची डायरेक्ट हॉटलाईन आहे. तर मला कोण विचारणार? प्रवेश झाला असता तर ते एवढे मोठे नेते आहेत राज्याच्या सर्वांना कळालं असतं ना. त्यांच्याविषय पक्षाचं जे मत असेल तेच माझं मत असेल. मी पक्षाच्या काही विरोधात नाही. पक्षाच ठरवत असेल तर विरोध करण्याच काही कारण नाही. मी तर जुना कार्यकर्ता आहे पक्षाने जर ठरवलं तर ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही”, अशी भूमिका गिरीश महाजन यांनी मांडली.
गिरीश महाजन यांची उन्मेष पाटील यांच्यावर टीका
“उन्मेष पाटील यांना पक्षाने आमदार केलं, खासदार केलं. मात्र यंदा पार्लमेंटरी बोर्डचे काही निकष असतील त्यानुसार त्यांचे तिकीट नाकारण्यात आले. पक्षासोबत एकनिष्ठ राहील, असं ते म्हणाले होते. मात्र अचानक काय निर्णय बदलला आणि ते ठाकरे गटात गेले. पक्षात आल्यानंतर दोनच महिन्यात त्यांना आमदारकी मिळाली. त्यानंतर खासदारकी मिळाली. मानाची अशी दोन पदे मिळाली. त्यांनी आणखी थोडी वाट बघायला हवी होती. भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कुणाच्या गेल्याने आणि जाण्याने काही फरक पडत नाही”, असं गिरीश महाजन म्हणाले.
“यावेळी गेल्यावेळपेक्षा जास्त मताधिक्याने आमचा उमेदवार निवडून येईल आणि सर्व रेकॉर्ड आम्हाला मोडायचे आहेत. जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात शंका घेण्याचं कारण नाही. आता त्यांनी लढावं घोडा मैदान समोर आहे”, असं चॅलेंज गिरीश महाजन यांनी दिलं.
“लोकांचं आयुष्य गेलं. मात्र तुम्हाला तात्काळ आमदारकी-खासदारकी मिळाली. त्यामुळे तुम्ही एवढी घाई करणं चुकीचं वाटतं. खासदारकी मिळाली नाही म्हणून पक्ष सोडला हे कुणालाही पटणार नाही. माझं आणि त्यांचं बोलणंही झालेलं नाही आणि त्यांनीही मला संपर्क साधलेला नाही. एकनाथ खडसेंच्या विरुद्ध असतानाही आपण त्यांना तिकीट दिलं. त्यांच्या पाठीशी राहिलो. पक्षातले सर्वच मला जवळचे आहेत. मात्र याच्यावर नाराज आहे त्याच्यावर नाराज आहे हे कारण इथे नको”, असं महाजन म्हणाले.
“करण पवार यांना गेल्यावेळीही विधानसभा लढ बोललो होतो. मात्र सबुरी महत्वाची आहे. पक्षात माणूस महत्त्वाचा नाही आपण पाहिला असेल या पक्षात मी मी म्हणणारे आज त्यांची अवस्था काय झाली. उन्मेश पाटील आणि करण पवार हे तर नवीन आहेत. मात्र मी मी म्हणणारे स्वयंभू नेते आहेत त्यांची आज काय परिस्थिती झाली?”, असं म्हणत गिरीश महाजन यांनी खडसेंवर निशाणा साधला.
महाजनांची ठाकरेंवर टीका
गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. “उद्धव ठाकरे यांनी आपली कबर स्वतःच खोदली आहे. ज्यावेळी तुम्ही आमच्याशी गद्दारी केली, अल्पशा सुखासाठी तुम्ही तिकडे गेलात. त्यामुळे तुम्ही आता दुःखात आहात. त्यामुळे आता तुम्ही काहीही म्हटलं तरी लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही. तुम्ही आता लढा आणि निकालातून दाखवा. कोण खरं आहे कोण खोटं आहे? हे समोर येईल. ठाकरे गटाला कुणीही उमेदवार मिळत नव्हतं. मात्र निवडणुकीसाठी कोणीतरी उमेदवार टाकतो. त्यामुळे त्यांनी यांच्या हाताला शिवबंधन बांधलं आहे”, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.