अहमदनगर : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा वाढदिवस सोहळा रविवारी संगमनेरच्या ओझर गावात पार पाडला. यावेळी निवृत्ती महाराजांची रथातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे निवृत्ती महाराज ज्या रथात होते त्याच रथात सर्वपक्षीय नेते देखील बसले होते.
निवृत्ती महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील आणि सत्यजित तांबे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमानंतर रोहित पवार यांनी फेसबुकवर या कार्यक्रमाची माहिती दिली.
“इंदुरीकर महाराज हे आपलं भूषण असून संत परंपरेचा वारसा ते आपल्या किर्तन सेवेच्या माध्यमातून पुढे घेऊन जात आहेत. समाजातील अंधश्रद्धा दूर करुन शिक्षणाचं प्रमाण वाढावं आणि समाजात प्रेम, आपुलकी, एकोपा निर्माण करण्यासोबतच लोकांच्या मनातील द्वेषाची जळमटं दूर करण्याचं काम आपल्या स्वतंत्र शैलीने ते करत आहेत. केवळ उपदेशाचे डोस न पाजता आधी स्वतः सामाजिक कामाचा आदर्श त्यांनी निर्माण केलाय. त्यांच्या संस्थेत अनेक अनाथ, गरीब मुलं आज मोफत शिक्षण घेतात, ही आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे”, असे रोहत पवार म्हणाले.
“वाढदिवसानिमित्त रथातून काढण्यात आलेल्या त्यांच्या मिरवणुकीत माझ्यासारख्या कार्यकर्त्यासह अन्य राजकीय मंडळींनाही त्यांनी स्थान दिलं. यावेळी त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा समाज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लोटला होता. ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या विद्यार्थ्यांचं वार्षिक स्नेहसंमेल आणि पारितोषिक वितरण समारंभही यावेळी झाला. महाराजांच्या वाढदिवसानिमित्त इथं काही संत मंडळींचाही मला सहवास मिळाला”, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.