आघाडी सरकार हे वसुली सरकार, पोलखोल करण्यासाठी जनतेत जाणार, भाजप प्रवक्ते राम कदम यांची माहिती
केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर भाजपतर्फे राजकारणासाठी केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडी करत आहे. ही प्रतिमा पुसण्यासाठी भाजप आता घरोघरी जाऊन मोठे कँपेन राबवणार असल्याची माहिती भाजप प्रवक्ते राम कदम यांनी दिली.
मयुरेश गणपत्ये, मुंबईः भाजप केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कट कारस्थान करत आहे, असा एक सूर राजकारणात उमटत आहे. ही प्रतिमा पुसण्यासाठी भाजप आता महाविकास आघाडीविरोधात (Mahavikas Aghadi) नवं कँपेन सुरु करणार आहे. महाविकास आघाडी सरकार केंद्रीय तपास एजन्सीविरोधात कशा प्रकारे राजकारण करतेय, याची थेट माहिती या कँपेनद्वारे जनतेला दिली जाईल. भाजप प्रवक्ते राम कदम (Ram Kadam) यांनी टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
महाविकास आघाडीची पोलखोल करणार- राम कदम
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात वक्तव्य करत आहेत. यात नवाब मलिक, अजित पवार यांचा समावेश आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी कशा प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर भाजप करत आहे, असा आरोप महाविकास आघाडी करत आहे. मात्र यावर आता भाजपदेखील पलटवार करणार आहे. एवढंच नव्हे तर भाजप थेट बूथ मीटिंगच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधेल. महाविकास आघाडी केंद्रीय तपास यंत्रणेला कशा प्रकारे बदनाम करत आहे, याची पोलखोल या संवादात केली जाईल, असी माहिती भाजप प्रवक्त्यांनी दिली.
आघाडी सरकार हे वसूली सरकार- राम कदम
भाजपच्या मोहीमेविषयी माहिती देताना राम कदम म्हणाले, आघाडी सरकार हे एक वसुली सरकार आहे. त्यांचे अधिकारी वसुली करतात. त्यांच्यावर सरकारचे नियंत्रण नाही. कारण सरकारच्या आशीर्वादानेच ही सर्व कामे चालतात. सरकार वसुली करत असेल तर ते योग्य आणि केंद्र सरकार तपास यंत्रणेद्वारे वसूली मंत्री किंवा अधिकाऱ्यांवर कारवाई करत असेल तर तो अन्याय? वसूली सरकारच्या याच धोरणाची पोलखोल करण्यासाठी आम्ही जनतेपर्यंत जाणार आहोत, अशी माहिती भाजप प्रवक्ते राम कदम यांनी दिली.
भाजपात आलेल्या इतर नेत्यांचंही म्हणणं ऐका- काँग्रेस प्रवक्ते
दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, भाजप घरोघरी जाऊन असा प्रचार करणार असेल तर चांगलंच आहे. पण काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस वगळता जे नेते भाजपात आले आहेत, त्यांचं बोलणंही जरा ऐकलं पाहिजे. आता कोणतीही केंद्रिय तपासणी यंत्रणा आपल्या मागे लागणार नाही. आता आपल्याला निवांत झोप लागेल.. असं हे नेते बोलतात. याचा अर्थ भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करतो, हे निश्चित आहे. भाजपचे काही नेते तर खुलेआम केंद्रीय तपास यंत्रणांच्या धमक्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना देत आहेत. त्यामुळे भाजपची एक नकारात्मक प्रतिमा तयार होत आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही चांगली बाब नाही. त्यामुळे भाजपकडून थेट जनमानसात जाऊन अशा प्रकारे प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे.
इतर बातम्या-