परळीत पूर्णा- हैद्राबाद रेल्वेत स्फोट, स्फोटाचे कारण धक्कादायक
पूर्णा- हैद्राबाद रेल्वेत स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या स्फोटात एक तरुण गंभीर झाला आहे. परळी स्टेशनवर रेल्वे उभी होती त्यावेळी ही घटना घडली. सय्यद अक्रम असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे.
बीड : पूर्णा- हैद्राबाद रेल्वेत स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या स्फोटात एक तरुण गंभीर झाला आहे. परळी स्टेशनवर रेल्वे उभी होती त्यावेळी ही घटना घडली. सय्यद अक्रम असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. या स्फोटाचे नेमकं कारण समोर आलं आहे.
सय्यद अक्रम हा मूळ परभणी जिल्ह्यातील पाथरी गावचा. हा तरुण आपल्या कुटुंबासह हैद्राबादकडे निघाला होता. ही ट्रेन सकाळी पावणे अकराच्या सुमारास इंजिन बदलण्यासाठी परळी रेल्वे स्थानकात थांबली. त्यावेळी अचानक एका डब्यातून स्फोट झाल्याचा आवाज आला. त्यामुळे रेल्वे स्थानकावर धावपळ उडाली.
माञ काही वेळानंतर याचे कारण समजल्यानंतर प्रवाशांना धक्का बसला. या ट्रेनमधून प्रवास करणारा सय्यद अक्रम सुतळी बॉम्ब तोंडात घेऊन पेटवण्याचा प्रयत्न करत असताना स्फोट झाला. या स्फोटात तरुणाचे तोंड आणि हात गंभीररित्या भाजले. परभणीहून हैद्राबादकडे प्रवास करणाऱ्या सय्यदला सुतळी बॉम्बशी मस्ती चांगलीच महागात पडली.
दरम्यान अचानक ही घटना घडल्याने प्रवाशांसह अक्रमच्या कुटुंबाची धावपळ उडाली होती. या प्रकारानंतर अक्रमला तात्काळ परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्याच्यावर प्रथम उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केलं आहे.
रेल्वेतून प्रवास करत असताना स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे हा गुन्हा आहे. माञ असं असताना देखील या तरुणाकडे हा बॉम्ब आला कसा..? या सुतळी बॉम्बशी हा तरुण खेळत असताना कोणाच्या लक्षात आलं नाही का..? या सारखे अनेक प्रश्न या निमित्ताने उभे राहत आहेत. काही दिवसांपासून परळी रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे किमान अशा घटना घडल्यानंतर तरी रेल्वे पोलिस सतर्क होतील का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.