Wadhawan case | वाधवान बंधूंचा क्वारंटाईनकाळ संपला, मात्र सातारा जिल्हा न सोडण्याचे आदेश
YES बँक घोटाळ्यातील आरोपी वाधवान बंधू (CBI court on Wadhawan case) आणि त्यांच्यांशी संबंधित 23 जणांचा क्वारंटाईनकाळ आज संपला आहे. सीबीआय त्यांना कोणत्याही क्षणी ताब्यात घेऊ शकतं.
सातारा : YES बँक घोटाळ्यातील आरोपी वाधवान बंधू (CBI court on Wadhawan case) आणि त्यांच्यांशी संबंधित 23 जणांचा क्वारंटाईनकाळ आज संपला आहे. सीबीआय त्यांना कोणत्याही क्षणी ताब्यात घेऊ शकतं. त्यामुळे सध्या वाधवान बंधूंना 5 मेपर्यंत जिल्हा सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. सीबीआय न्यायालयाने तसे आदेश दिले आहेत (CBI court on Wadhawan case).
वाधवान कुटुंबाला 5 मेपर्यंत पोलीस बंदोबस्तात त्यांच्या महाबळेश्वर येथील निवासस्थानी राहण्याची मुभा कोर्टाने दिली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल, असा निर्णय सीबीआय कोर्टाने घेतला आहे.
लॉकडाऊनच्या काळात जिल्हाबंधी असूनही, वाधवन कुटुंबियांनी गृहविभागातून प्रवासाचं पत्र मिळवलं होतं. मात्र सीबीआयच्या आरोपींनी हे पत्र कसं मिळालं याची चर्चा केवळ राज्यात नव्हे तर देशभर रंगली होती.
त्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी तातडीने हालचाली करत, वाधवान बंधू आणि त्यांच्यासोबतच्या 23 जणांना पाचगणीत क्वारंटाईन केलं होतं. त्यांचा क्वारंटाईन काळ आज संपला आहे. मात्र त्यांना सातारा जिल्हा सोडता येणार नाही.
सातारा जिल्हा सोडण्याआधी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. वाधवान बंधूंवर 3 मेनंतर लॉकडाऊन संपल्यावर पुढील कारवाई करण्याचा निर्णय CBI न्यायालयाने दिला.
वाधवान कुटुंबीय हे महाबळेश्वरचे नागरिक असल्याने ते उद्यापासून 5 मेपर्यंत त्यांच्या महाबळेश्वरच्या वाधवान हाऊसमध्ये वास्तव्य करणार आहेत. मात्र यावेळी तिथेही पोलीस बंदोबस्त असेल.
उद्या कारवाईची शक्यता
दरम्यान, वाधवान बंधूंची इतक्यात सुटका होण्याची शक्यता कमी आहे. कारण त्यांचा 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपला असला तरी, जिल्हाबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी सातारा पोलिसांनी केली आहे. उद्या ही कारवाई होण्याची शक्यता आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
राज्य सरकारचे आदेश धुडकावून सातारा जिल्ह्यात प्रवेश केल्याप्रकरणी प्रसिद्ध उद्योगपती कपिल आणि धीरज वाधवान यांच्यासह 23 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाधवान कुटुंबाशी निगडीत 23 जणांना पाचगणीच्या बेल एअर रुग्णालयात 14 दिवसासाठी क्वारंटाइन करण्यात आलं होतं. ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी देश लॉकडाऊन असतानाही या कालावधीत ‘डीएचएफएल’चे संस्थापक असलेल्या वाधवान कुटुंबाला खंडाळ्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी प्रधान सचिवांनी मदत केल्याने वाद निर्माण झाला होता.
प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी अधिकारांचा गैरवापर करत वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत केल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. गुप्ता यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवरच रहावे लागणार आहे.
वाधवान कुटुंबाशी निगडीत 23 जणांविरोधात शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाबळेश्वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 51/2020 भादंवि कलम 188, 269, 270, 34 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51-ब साथ रोग प्रतिबंध कायदा 1897 चे कलम 2 च्या अनुषंगाने स्थापित केलेल्या कोविड-19 उपाययोजना 2020 च्या 11 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार पाचगणीच्या बेल एअर रुग्णालयात सर्वांना 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे.
प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या लेटरहेडवरुन वाधवान बंधूंना एक पत्र जारी करण्यात आले आहे. वाधवान बंधूंचा ‘माझे कौटुंबिक मित्र’ असा उल्लेख करत अमिताभ गुप्ता यांनी वाधवान यांच्या पाच गाड्यांसाठी विशेष पास जारी केला होता.
या सर्वांना कौटुंबिक अत्यावश्यक कारणासाठी खंडाळा येथून महाबळेश्वरला जायचे आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले होते. पाच गाड्यांचे नंबर आणि प्रत्येक गाडीतून प्रवास करणाऱ्या व्यक्तीची नावेही यावर होते. मात्र, प्रत्यक्षात वाधवान कुटुंब आणि त्यांची मित्र मंडळी असे 23 जण फिरण्यासाठी महाबळेश्वरला गेल्याचं समोर आलं.
वाधवान कुटुंब चौकशीच्या फेऱ्यात
‘दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड’चे (डीएचएफएल) संस्थापक कपिल आणि धीरज वाधवान बंधूंचा अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्चीशी संबंध आणि ‘येस बँके’कडून घेतलेले कर्ज थकित झाल्याप्रकरणी ईडीकडून मनी लॉन्डरिंग कायद्या अंतर्गत तपास सुरु आहे. मिर्ची प्रकरणात त्यांना फेब्रुवारी महिन्यात जामीन मिळाला. तर येस बँक प्रकरणी तपास अद्याप सुरु आहे. तपास सुरु असतानाच वाधवान बंधूंनी मुंबईबाहेर पळ काढल्याने आणि त्यातही संचारबंदीच्या काळात प्रवास केल्याबद्दल ईडीने त्यांना परत आणण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
संबंधित बातमी :
महाबळेश्वर पर्यटन भोवलं, वाधवान कुटुंबासह 23 जणांवर गुन्हे, पाचगणीत 14 दिवस क्वारंटाइन