मुंबई : “जनतेनं काही दिवस घराबाहेर पडू नये. घराबाहेरची काळजीदेखील घेऊ नये (CM Uddhav Thackeray appeal people). घराबाहेरच्या लढाईसाठी सरकार सज्ज आहे. त्यामुळे घरातच बसा. अन्यथा सरकारला कठोर पावलं उचलावे लागतील”, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक सूचना दिल्या (CM Uddhav Thackeray appeal people).
“कोरोनाला पहिल्या पायरीवर थांबवलं तर तो पुढे वाढत नाही. गरोदर महिला, वृद्ध, मधुमेहबाधित आणि लहान मुलांची काळजी घ्या. कारण त्यांच्यामध्ये तीव्र लक्षण आढळून येत आहेत. कोरोनाच्या गुणाकाराचा काळ आता सुरु झाला आहे. या काळात आपल्याला कोरोनाची वजाबाकी करायची आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“जीवनाश्यक वस्तूंच्या दुकानात गर्दी केली तर कठोर पावलं उचलावे लागतील. सर्व यंत्रणा सूसज्ज आहे. जर या लढाईत पुढचे पाऊल टाकावे लागले तर त्यासाठी आपण सज्ज आहोत. तुम्ही घराबाहेरची काळजी करु नका नका. तुम्ही घरात राहा. सगळे मिळून आपलं काम करा, कुटुंबासोबत हसत खेळत राहा, कॅरम, चेस, गाण्याच्या भेंड्या खेळा”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
“संपूर्ण राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात इतर राज्यातले कामगार त्यांच्या घरी जाण्यासाठी फार उत्सूक आणि उतावळे झाले आहेत. मी त्या सर्वांना सांगू इच्छितो, कृपया जिथे आहात तिथेच थांबा. आपली संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेत आहे. तुमच्या जेवणाची सोय महाराष्ट्र सरकार घेत आहे. आतापर्यंत जवळपास 163 ठिकाणी हे केंद्र सुरु केली आहेत. अजूनही ही केंद्र वाढवत आहोत. त्यामुळे कुणीही गोंधळून जाऊन दुर्घटना घडेल अशी चूक करु नका, जिथे आहात तिथेच थांबा”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
“शेतमजूर, कामगार यांचं तळहातावर पोट आहे. त्यांनी जिथे आहेत तिथेच थांबावं. इतर राज्यातही आपल्या महाराष्ट्राचे कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा मी आवाहन करतो की आहात तिथेच थांबा. तुम्हाला तिथे मदतीची गरज भासत असेल तर मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधा. जेणेकरुन तिथल्या मुख्यमंत्र्यांशी बोलू आणि तिथल्या तिथे आपली सोय होईल”, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
संबंधित बातम्या :
राजनेही मला फोन करुन सूचना दिल्या, त्याबद्दल धन्यवाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
‘लॉकडाऊनचे काटेकोर पालन करा, अन्यथा…’ तुकाराम मुंढे यांचा इशारा