Cm uddhav Thackeray : हिंदूत्व, राज ठाकरे, महागाई, फडणवीस,बाबरी, मुख्यमंत्र्यांची चौफेर बॅटिंग, वादळी भाषणातले 10 मुद्दे
मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्वापासून (Hindutva) सुरूवात करत, देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) अयोध्येतील बाबरी पाडल्याचा दाव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जुना भाजप आणि आत्ताचा भाजप, राज ठाकरे, केतकी चितळे, महागाई, दाऊद, सोमय्यांची झेड प्लस सुरक्षा या मुद्द्यांवरून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.
मुबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) आज मुंबईतल्या बीकेसीत वादळी सभा पार पडली आहे. या सभेत मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्वापासून (Hindutva) सुरूवात करत, देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) अयोध्येतील बाबरी पाडल्याचा दाव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जुना भाजप आणि आत्ताचा भाजप, राज ठाकरे, केतकी चितळे, महागाई, दाऊद, सोमय्यांची झेड प्लस सुरक्षा या मुद्द्यांवरून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. तसेच ईडी, सीबीआयवरूनही भाजपला इशारा दिला आहे. भाजपचा मुंबई महाराष्ट्रपासून तोडण्याचा डाव आहे. मात्र आम्ही नामर्दाची औलाद नाही, कुणी मुंबईचा लचटका तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचे तुकडे-तुकडे केल्याशिवाय सोडणार नाही, असा इशाराही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर आता भाजप नेत्यांच्याही यावर जोरदार प्रतिक्रिया उलटू लागल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील प्रमुख दहा मुद्दे
- देवेंद्र फडणवीस – गधाधारी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बीकेसी मैदानावरुन भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी आमचं हिंदुत्व हे गदाधारी हिंदुत्व आहे घंटाधारी नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं हिंदुत्व आता गदाधारी नाही तर गधाधारी झाल्याची जोरदार टीका केली होती. त्यावर आता उद्धव ठाकरे यांनीही पलटवार केलाय.
- फडणवीस अयोध्या दावा-. फडणवीस बाबरी पडली तेव्हा तुमच वय बोलता किती? आमच्यावर शंका उपस्थित करता मग देवेंद्रजी तुम्ही हिंदुत्वासाठी काय केले. तुम्ही चढला असता तर बाबरी तशीच खाली आली असती. मी साहेबांना सांगितले बाबरी पाडली. तेवढ्यात फोन वाजला म्हणाले मला त्याचा अभिमान, असे म्हणत त्यांनी फडणवीसांच्या या दाव्याचाही समाचार घेतला
- हिंदूत्व- तर हिंदुत्व टोप्यात नसतं. मेंदूत असतं. तुम्ही भगव्या टोप्या दाखवत असाल तर संघाची टोपी काळी का? ही अशी विकृत माणसं. आम्ही म्हणजेच हिंदू हे आम्हाला सांगायची गरज नाही. तुमचं विकृत हिंदूत्व आम्हाला मान्य नाही. शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचा विचार दिला हे विखार देत आहेत. ही विखारी माणसं देशाचा कारभार काय करणार, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ– मला फडणवीसांना विचारायचं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात तुमचा पक्ष नव्हता आणि आमचा पक्ष नव्हता. तुमची मातृसंस्था संघ. संघाला 100 वर्ष होतील. स्वातंत्र्य पूर्व काळात संघ अस्तित्वात होता. एकदाही संघ स्वातंत्र्य लढ्यात उतरला नाही. असेल तर दाखले दाखवा. त्या स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही नव्हता, असे म्हणत त्यांनी संघावरही टीका केली आहे.
- नवा भाजप– तुमचा भाजप वाजपेयींचा भाजप राहिला आहे का? असा सवाल यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही म्हणाऱ्या बाजपला केला आहे.
- राज ठाकरे-उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मला एका शिवसैनिकांने विचारलं साहेब तुम्ही लगे रहो मुन्नाभाई पाहिला का? म्हटलं थोडासा पाहिला, का रे? त्यात नाही तो संजय दत्तला गांधीजी दिसतात, मग तो गांधीगिरी करायला लागतो. मी म्हटलं मग, त्यावर तो म्हणतो तशी एक केस आहे आपल्याकडे. ती नाही का, ज्याला स्वत:ला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं. शाल घेऊन फिरतात म्हणे हल्ली. मग कधी मराठीच्या नादाला लागतात, कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. म्हटलं अरे चित्रपटातला मुन्नाभाई लोकांचं भलं तरी करत होता, हा कुठला मुन्नाभाई काढलास तू? तो म्हणाला तसं नाही… चित्रपटाच्या शेवटी त्या मुन्नाभाईला कळतं की साला अपुनके भेजेमे केमिकल लोचा हुआ है… तर ही केमिकल लोचाची केस आहे. हा पिक्चर सत्य घटनेवर आधारीत आहे. असे अनेक मुन्नाभाई फिरतात फिरू द्या. आता कुणाला अयोध्येला जायचं आहे जाऊ द्या’. असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली.
- केतकी चितळे-येताना बातमी पाहिली. कोणी तरी बाई आहे. तिने पवारांवर विचित्र कमेंट केली. काय घरी आईवडील आजी आजोबा आहे की नाही. संस्कार होतात की नाही. किती काही झांल तर बाई तुझा संबंध काय कुणावर बोलतेस काय बोलतेस हे तुझं वक्तव्य असेल तर तुझ्या मुलांचं काय होणार ती काय होणार. हा सुसंस्कृतपणा आहे तो आपल्या देशातून राज्यातून जात आहे. ते जपायचं आहे. ते खरं हिंदुत्व आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी केतकी चितळेचाही समाचार घेतला आहे.
- महागाई– महागाईवरून केंद्रावर हल्लाबोल चढवताना मुख्यमंत्री म्हणाले, आता काय गो महागाई गो, गो बेकारी गो म्हणून थाळी वाजवा. तुमचं हिंदूत्व घंटा वाजवायची. आमचं हिंदुत्व हृदयात राम आणि हाताला काम असं आहे. स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र नंबर वन आहे. महाराष्ट्र पुढे जात आहे. हे त्यांना बघवत नाही. म्हणून कायदा सुव्यवस्थेची वाट लागली आहे, असे म्हणत त्यांची केंद्रावर तोफ डागली आहे.
- दाऊद– तसेच आता दाऊदच्या मागे लागलेत. दाऊद म्हणाला मी भाजपमध्ये येतो तर मंत्री म्हणून त्यांच्यासोबत कधीही दिसू शकतो. कदाचित म्हणून त्याच्या मागे लागले असतील. बघ ईडी बिडीमुळे लोकं कसे आमच्यात येत आहेत. आमच्यात ये मग तुला मंत्री बनवतील. नंतर म्हणतील दाऊद तसा काही नाही हो. दाऊद म्हणजे गुणाचा पुतळा आहे. असा पलटवार त्यांनी केला आहे.
- झेड प्लस सुरक्षा-किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला आणि सुरक्षा यावरूनही त्यांनी चिमटे काढले आहेत. सुरक्षा किती झेड प्लस. कोण देतयं केंद्र सरकार. कुणाला तर या टिनपाटांना. तिकडे काश्मिरी पंडितांना सुरक्षा नाही. राहुल भट सांगत होता बदली करा. पण ऐकलं नाही. पण इथे भोकं पडलेल्या टीनपाटांना सुरक्षा देत आहेत केंद्राची. कुणाला वाय प्लस कुणाला झेडप्लस. बापाचा माल आहे तुमच्या. लोकांचा पैसा आहे तो. लोकांच्या पैशावर ज्यांनना सुरक्षा द्यायची त्यांना देत नाही आणि अशा लोकांना देतात. भोकं पडललेल्या गळक्या टीनपाटाचा उपयोग काय. टीनपाट बोललो. खरंतर टमरेल बोलायचं होतं, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी सोमय्यांना चिमटे काढले.