गॅरेजच्या रॅम्पमधील पाण्यात खेळताना बुडाली, विरारमध्ये 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
विरारमध्ये बंद असलेल्या गॅरेजच्या मोकळ्या रॅम्पमध्ये बुडून 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली (Death child by drowning in Garage ramp in Virar).
पालघर : विरारमधील पूर्व कणेर राईपाडा येथे टाळेबंदीमुळे बंद असलेल्या गॅरेजच्या मोकळ्या रॅम्पमध्ये बुडून 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली (Death child by drowning in Garage ramp in Virar). आराध्या असं या चिमुकलीचं नाव असून ती गॅरेजवर असलेल्या सुरक्षारक्षकाची नात होती. ती परिसरात खेळत असताना गाडी धुण्याच्या रॅम्पच्या खड्ड्याजवळ पोहचली. रॅम्पमध्ये पाणी पाहून ती खेळण्यासाठी पाण्यात उतरली. मात्र, खड्ड्यातील पाणी जास्त असल्याने तिचा पाण्यात बूडून मृत्यू झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विरार पूर्व कणेर राई पाडा परिसरात बिपीन राऊत यांचे सिद्धेश नावाचे गॅरेज आहे. याच गॅरेजमध्ये काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांची 3 वर्षांची आराध्या ही नात सायंकाळच्यावेळी परिसरात खेळत असताना गाडी धुण्याच्या रॅम्पच्या खड्ड्याजवळ पोहचली. रॅम्पमध्ये पाणी पाहून ती खेळण्यासाठी पाण्यात उतरली. पण पाणी तिच्या उंचीपेक्षा जास्त खोल असल्याने त्यात बुडून तिचा मृत्यू झाला.
आराध्या खेळत असताना सुरक्षारक्षक तिचे आजोबा आणि कुटुंबीय त्याच्या घरात झोपलेले होते. पावसामुळे या रॅम्पमध्ये सतत पाणी जमा होऊन राहते. टाळेबंदी असल्याने गॅरेज बंद होते. तसेच आसपास जवळ कुणी राहत नसल्याने कुणाला तिच्या ओरडण्याचा आवाज आला नाही. जेव्हा तिला शोधण्यासाठी बाहेर पडले तेव्हा ती गॅरेजच्या रॅम्पच्या गाडी धुण्याच्या खड्ड्यात आढळून आली.
तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झालेला होता. तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या संदर्भात कुणाची तक्रार नसल्याने विरार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली आहे.
हेही वाचा :
अंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू
अहमदनगरमध्ये चार सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू, जालन्यात पाच मुली तलावात बुडाल्या
Death child by drowning in Garage ramp in Virar