टेस्टिंग वाढवा, कोरोना लढ्यासाठी महापालिकांना मदत करा, फडणवीसांचं राज्य सरकारला आवाहन
राज्य सरकारने टेस्टिंग वाढवावी, कोरोना लढ्यासाठी महापालिकांना आर्थिक मदत करावी, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं (Devendra Fadnavis appeal Thackeray government).
पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (23 जून) पुण्याचा दौरा केला (Devendra Fadnavis appeal Thackeray government). या दौऱ्यानंतर संध्याकाळी पाच वाजेच्या सुमरास त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारने टेस्टिंग वाढवावी, कोरोना लढ्यासाठी महापालिकांना आर्थिक मदत करावी, असं आवाहन केलं (Devendra Fadnavis appeal Thackeray government).
महाराष्ट्रातील विविध भागात जाऊन तिथला आढावा घ्यावा, तिथली काय परिस्थिती जाणून घ्यावी, एखाद्या भागात काही अडचणी असतील तर त्या सरकारपर्यंत पोहोचवून सोडवण्याचा प्रयत्न करावा, या उद्दीष्टाने दौऱ्याला सुरुवात केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
‘सरकारने कोरोना लढ्यासाठी महापालिकांना मदत करावी’
“पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही महापालिकांनी मोठ्या प्रमाणात आपली संसाधने वापरुन व्यवस्था उभ्या करण्याचा प्रयत्न केला. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं की, पुणे महापालिकेने कोरोनाविरोधाच्या लढाईत आतापर्यंत जवळपास 150 कोटी रुपये खर्च केले. ते आवश्यकदेखील आहे. पण, राज्य सरकारनेदेखील महापालिकांना मदत करायला हवी”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“मुंबई महापालिका श्रीमंत महापालिका मानली जाते. त्यामानाने इतर महापालिकांकडे तितका पैसा नाही. तर काही महापालिकांमध्ये कर्मचाऱ्यांचा जेमतेम पगार भागतो इतका पैसा आहे. कोरोना संकट काळात शहरांमध्ये महापालिका मोठा भार उचलत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने महापालिकांना आर्थिक मदत दिली पाहिजे”, असं आवाहन फडणवीस यांनी राज्य सरकारला केलं आहे.
हेही वाचा : आज गौप्यस्फोट करतोय, थेट राष्ट्रवादीची ऑफर होती, चर्चाही झाल्या, पण पवारांनी भूमिका बदलली : फडणवीस
‘राज्य सरकारने टेस्टिंग वाढवावी’
“पुण्याची टेस्टिंगची क्षमता फार कमी आहे. दिल्लीत 18 हजार टेस्ट होतात. मात्र, महाराष्ट्रात 36 हजार टेस्टची क्षमता असताना फक्त 14 हजार टेस्ट केल्या जातात. मुंबईत 10 हजारांची क्षमता असताना 4 हजार टेस्ट केल्या जातात. हे घातक आहे. कोरोनाच्या आताच्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करुन आयसोलेशन करणं जरुरीचं आहे. रुग्णांवर उपचार करुन त्यांना घरी सोडणं किंवा होम क्वारंटाईन करणं, जरुरीचं आहे”, असं फडणवीस म्हणाले.
“बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनेटेड बेड्स या गोष्टी मोठ्या प्रमाणात उभारण्याची आवश्यकता आहे. पण, अद्यापही पुण्यासारख्या शहरात टेस्टिंगची संख्या वाढवली जात नाही. त्यामुळे मला असं वाटतं की, काही प्रमाणात सरकारचं दुर्लक्ष आहे. त्यामुळे पुण्यात टेस्टिंगची व्यवस्था वाढवली जावी, अशी विनंती मी सरकारकडे करणार आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
‘रेट ऑफ इन्फेक्शनचा विचार करावा’
“पुण्याचा रेट ऑफ इन्फेक्शन बारा ते साडेबारा टक्के होता. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसात हा रेट 18 टक्क्यांवर पोहोचला. सात ते आठ टक्क्यांनंतर टेस्टिंग दुप्पट केली पाहिजे. तरंच आपल्याला रुग्ण वाढवतात येतात आणि त्यातून होणारा संसर्ग वाचवता येतो. किती पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत त्यापेक्षा रेट ऑफ इन्फेक्शनचा विचार केला पाहिजे. किती लोकांचा मृत्यू वाचवू शकतो, हे पाहिलं पाहिजे. ते आपण टेस्टिंग वाढवूनच करु शकणार आहोत”, असं फडणवीस म्हणाले.
हेही वाचा : सुजय विखेंना पक्षात का घेतलं? मेधाताईंना विधानपरिषद का नाकारली?, देवेंद्र फडणवीसांची उत्तरं
“केद्र सरकारचं जे आरोग्य पथक राज्यात येऊन गेलं त्या पथकाने टेस्टिंग वाढवण्याची सूचना केली होती. याशिवाय जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचं नियोजन करण्याकरता अधिकचे आयसीयू बेड्स, ऑक्सिजनेटेड बेड्स आणि काही प्रमाणात व्हेंटिलेटर्स याचा विचार करण्याची आवश्यकता आहे”, असंदेखील ते म्हणाले.
‘राज्य सरकारने बील संदर्भात जीआरमध्ये सुधारणा करावी’
“प्रशासन चांगलं काम करत आहे. प्रशासन उपलब्ध संसाधनांच्या आधारे प्रयत्न करत आहे. डॅशबोर्ड चांगले आहेत. पण खासगी रुग्णालयांशी योग्य समन्वय साधला जाताना दिसत नाही. राज्य सरकारने खासगी रुग्णालयांसाठी जो जीआर काढला आहे, त्यात 80 टक्के बेड्स सांगितले आहेत. पण ते बेड्स मिळतात की न मिळतात, ते ओळखण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही”, असं फडणवीस म्हणाले
“खासगी रुग्णालयातील आयसू बेड्सपैकी किती बेड्स मिळणार आहेत? व्हेंटिलेटर मिळणार की नाही? याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. राज्य सरकारने बील संदर्भात जे काही रेट्स ठरवून दिले आहेत त्याबाबत सुधारणा करावी. खासगी रुग्णालयात आयसीयूचा रेट 9 हजार ठरवला असेल तर ते पैसे बीलमध्ये जोडले जातात. त्यासोबत पीपीई किट्स किंवा इतर चार्जेसचेही पैसे बीलमध्ये लावले जातात. त्यामुळे सरकारने त्यासंदर्भात जीआरमध्ये सुधारणा करुन कशाबाबत किती पैसे घेतले पाहिजे? याबाबत नियम केले पाहिजेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस उद्या सोलापूरच्या दौऱ्यावर
“सकाळी पहिल्यांदा पिंपरी-चिंचवडचा गेलो. त्यानंतर आम्ही पुण्याचा दौरा केला. उद्या मी सोलापूरचा दौरा करणार आहे. टप्याटप्याने इतरही ठिकाणी जिथे जास्त रुग्ण आहे, अशा ठिकाणी मी स्वत: जाणार आहे, याशिवाय आमचे पदाधिकारीदेखील जाणार आहेत. आमचे केंद्रीय मंत्रीदेखील जाणार आहेत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
“या दौऱ्यामागचा हेतू हा केवळ तिथल्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवता कशा येतील, याशिवाय त्या सरकारपर्यंत कशा पोहोचवता येतील असाच प्रयत्न या माध्यमातून आम्ही करत आहोत”, असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं.