यशराज फिल्म्स, सलमान खानने अनेकांना उद्ध्वस्त केलं, सुशांतच्या आत्महत्येची चौकशी करा : दबंगच्या दिग्दर्शकाची मागणी
दबंग चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यपने सुशांत सिंहच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे (Abhinav Kashyap on Salman Khan after Sushant Singh Suicide).
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी सुशांतने आत्महत्या केल्याने त्याच्या मृत्यूविषयी अनेक तर्कवितर्क लावले गेले. बॉलिवूडमध्ये परिवारवाद असल्याचा आरोपही झाला. आता दबंग चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यपने सुशांत सिंहच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे (Abhinav Kashyap on Salman Khan after Sushant Singh Suicide). त्याने फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट करुन आपली भूमिका मांडली. ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. यात त्याने सलमान खान, खान कुटुंब आणि यशराज फिल्म्सवरही गंभीर आरोप लावले.
अभिनव कश्यप म्हणाला, “मी सरकारला विनंती करतो की त्यांनी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी. सुशांतच्या मृत्यूने चित्रपटसृष्टीत आपण रोज अनुभवत असलेल्या प्रश्नाला समोर आणलं आहे. कदाचित त्यानेच त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असेल. मीटू चळवळीप्रमाणेच सुशांतचा मृत्यू हा देखील एका विशाल हिमनगाचं केवळ वरचं टोक असावं, अशी मला भीती आहे. यशराज फिल्म टॅलेन्ट मॅनेजमेंट एजन्सीने सुशांतला आत्महत्येला प्रवृत्त करण्यात भूमिका केलेली असावी. मात्र, हा तपासाचा विषय आहे. हे लोक कुणाचंही करिअर बनवत नाही, तर ते लोकांचं करिअर आणि आयुष्य उद्ध्वस्त करतात.”
“मी स्वतः मागील एक दशकापासून हे सर्व अनुभवतो आहे. यावरुन मी अगदी विश्वासाने सांगू शकतो की बॉलिवूडमधील प्रत्येक टॅलेन्ट मॅनेजर आणि एजन्सी कलाकारांसाठी मृत्यूचा सापळा आहे. ते खरंतर सफेद पोशाखातील दलाल आहेत आणि यात सर्वजण सहभागी आहेत. त्यांच्यात अलिखित नियमावली आहे. त्यांचा फक्त एकच मंत्र आहे कुणीही साळसुद नाही, सर्व उघडे आहेत आणि जे उघडे नाहीत, त्यांना उघडं करा. एक जरी पकडला गेला तरी सर्वजण पकडले जातील,” असंही अनुभव कश्यपने म्हटलं.
‘सलमान खानने त्याच्या भावांसाठी माझं करिअर उद्ध्वस्त केलं’
अभिनव कश्यप म्हणाला, “सलमान खानने अरबाज खान आणि सोहेल खानच्या प्रेमापोटी माझं करिअर उध्द्वस्त केलं. दबंग सिनेमानंतर त्याने माझ्यासोबत विश्वासघात केला. सलमानने दबंग 2 चं दिग्दर्शन माझ्याऐवजी अरबाज खानकडे दिलं. त्यानंतर सोहेल आणि अरबाज सातत्याने मला धमक्या देत आले. माझा पुढचा सिनेमा बेशरमला वितरक मिळणार नाही यासाठीही सलमानने फिल्डिंग लावली. मात्र, मी शेवटी जीवावर उदार होऊन रिलायन्ससोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती केली. खान कुटुंबीयांनी मला खूप मनस्ताप दिला आहे.”
बॉलिवूडमध्ये कास्टिंग एजन्सी आणि कास्टिंग डिरेक्टरचं खूप मोठं जाळं आहे. सगळा चित्रपट व्यवसाय कमिशनवर चालतो. आऊट सायडरसाठी हे धोकादायक आहे. कलाकारांचा आत्मविश्वास संपवण्यासाठी हे लोक काम करतात, असाही आरोप त्याने केला.
संबंधित बातम्या :
Sushant Singh Rajput suicide l बॉलिवूडमधील दुश्मनीची बाजूही तपासणार, गृहमंत्र्यांचा थेट इशारा
Kangana on Sushant Suicide | इंडस्ट्रीतील कंपूशाहीने सुशांतचा बळी घेतला, कंगनाचा बॉलिवूडवर संताप
Abhinav Kashyap on Salman Khan after Sushant Singh Suicide