BLOG : सावित्रीच्या लेकीची तारेवर कसरत
देशात आज (3 जानेवारी) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule anniversary) यांचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. परंतु अस्तित्व अन् जगण्यासाठी सावित्रीच्या लेकीला आजही तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र बीड शहरात दिसून आले.
बीड : देशात आज (3 जानेवारी) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule anniversary) यांचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. परंतु अस्तित्व अन् जगण्यासाठी सावित्रीच्या लेकीला आजही तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र बीड शहरात दिसून आले. जगण्यासाठी तारेवर चालत असलेल्या बालिकेचा लढा पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत होते. मात्र तिच्या अस्तित्वासाठी पुन्हा क्रांतीच्या ज्योती पेटतील का हाच प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. एरवी मातृसत्ताकची महिला-मुलींच्या (Savitribai Phule anniversary) सक्षमीकरणाची टिमकी वाजणार्यांचा ढोंगीपणा आणि पुरुष प्रधान संस्कृतीचा समाज मनावर असलेला पगडा आजही कायम असल्याचे यातून दिसत आहे.
चूल आणि मूल यातचं स्त्रियांचं विश्व सामावले होते. त्याकाळी रुढी आणि परंपरेच्या बंधानात महिला अडकेलल्या असताना 1848 मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिला-मुलींना शिक्षणाची दारं खुली करुन दिली. चूल आणि मूल या रुढी परंपरेच्या साखळ दंडातून त्यांची सुटका केली. त्यामुळेचं की, काय आज महिला विविध क्षेत्रात गगन भरारी घेत पुरुषांच्या खांद्याला- खांदा लावून काम करत आहेत. स्त्री-पुरुष समानतेची वल्गना मोठा गाजावाजा करुन केली जाते. मात्र, तरी सुद्धा महिला-मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार समोर येतो. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या कार्याचे दाखले देऊन त्यांच्या प्रमाणे आजच्या महिला आणि मुलींनी आचरण करण्याचे धडे प्रत्येकवर्षी दिले जातात. अनेकांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन तसा संकल्पही केला. परंतु त्यांचा हा संकल्प किती तगलादू असल्याचे समोर आलं आहे.
बीड शहरातील नगररोड रस्त्यालगत एका डोंबारी कुटुंबाला टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तारेवर चालून कसरत करत एक बालिका येथून ये-जा करणार्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत होती. यातून मिळणार्या पैशातून तिच्या कुटुंबाला आणि तिला रात्रीच्या जेवणावेळी भाकरीचा चंद्र दिसणार होता. भाकरीच्या चंद्रासाठी डोंबारी समाजातील अनेक बालिका तारेवर संघर्ष करत आहेत. मात्र हा संषर्घ त्यांच्या वाट्याला येऊ नये. म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपले आयुष्यपणाला लावले होते. परंतु तरीसुद्धा आस्तित्व आणि जगण्यासाठी अशा बालिकांचा आजही लढा चालूच असल्याचे दिसत आहे.
स्त्री-पुरुष समानता, महिला आरक्षण, महिलांचे सक्षमीकरण, त्यांच्या सुरक्षा-कायद्यांचा कांगावा केला जातो. मात्र 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आता महिलांनी विविध क्षेत्रात प्रगतीच नव्हे तर त्यांना स्वातंत्र्य मिळाल्याचा अभास निर्माण केला जातो. पण आजही महिला स्वातंत्र आहेत? महिलांनी शिक्षणासह विविध क्षेत्रात प्रगती केली? त्यांना संधी मिळाली? त्या सुरक्षीत आहेत. खरच त्यांना समान वागणूक दिली जाते? असे एक ना अनेक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत.
सक्षमीकरणाची टिमकी वाजणार्यांचा ढोंगीपणा आणि पुरुष प्रधान संस्कृतीची पायमुळे नष्ट करण्यासाठी महिलांनीच महिलांचा उद्धार करण्यासाठी पुढे यावे लागणार आहे. जोपर्यंत डोंबारी समाजातील त्या चिमुकलीचे तारेवरील तिचे पाय शाळेच्या दिशेने पडत नाहीत, महिलांवरी अत्याचाराच्या घटना थांबत नाहीत, तोपर्यंत कसे म्हणता येईल, की जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी!
(ब्लॉगमधील मते वैयक्तिक आहेत)