औरंगाबादः नव्या वर्षात ऐतिहासिक नगरी औरंगाबादचे चित्र पालटण्याची योजना महापालिकेने आखली आहे. या वर्षात शहरातील दरवाजांवर आकर्षक रोषणाई केली जाणार आहे. या योजनेत शहरातील आठ दरवाजे आणि शहागंज येथील ऐतिहासिक घड्याळाच्या मनोऱ्यावर आरजीबीडब्ल्यू लायटिंग केली जाणार आहे. स्मार्टी सिटीने 1 कोटी 40 लाख रुपयांच्या खर्चातून हा प्रकल्प हाती घेतला आहे.
महत्त्वाच्या सण आणि उत्सवांच्या प्रसंगी वेगवेगळ्या या ठिकाणी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारीत रोषणाई केली जाईल. रात्रीच्या वेळी पर्यटक याकडे विशेष आकर्षित होतील, असा विश्वास स्मार्ट सिटीला वाटतोय. वेरूळ, अजिंठा लेणी पाहून शहरात मुक्कामी आलेल्या पर्यटकांना औरंगाबादमधील दरवाजे आणि ऐतिहासिक ठेव्यांचे दर्शन घडवण्यासाठी हा उपक्रम महापालिकेतर्फे राबवण्यात येत आहे.
शहरातील रंगीन गेट, खिजरी गेट, काला गेट, पैठण गेट, मेहमूद दरवाजा, नौबत दरवाजा, रोशन गेट, जाफर गेट आणि नव्याने दुरुस्त करण्यात आलेल्या शहागंजच्या वॉच टॉवरवर रोषणाई केली जाईल. स्मार्ट सिटीतर्फे 3 कोटी 20 लाख रुपये खर्च करून 9 दरवाजांची दुरूस्ती आणि सौंदर्यीकरण केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही लायटिंग केली जामार आहे. जानेवारी महिन्यात यासाठीच्या निविदा उघडल्या जातील आणि पुढील तीन महिन्यात हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
इतर बातम्या-