हॉटेलमध्ये बोलावून खंडणी मागितली, सेना आमदाराच्या मुलाविरोधात गुन्हा
खंडणी न दिल्यास तक्रारदार राजेश शेटकर यांच्या वाहनांची तोडफोड करण्याची विकास गोगावलेंनी धमकी दिली होती.
महाड : रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांच्या मुलाविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास गोगावले असे आमदार भरत गोगावले यांच्या मुलाचे नाव आहे. मुंबईतीली भांडुप येथील वाहतूक व्यावसायिक राजेश शेटकर यांच्याकडे महाड एमआयडीसीत व्यावसाय करण्यासाठी विकास गोगावले यांनी खंडणीसाठी राजेश यांना धमकावल्याचा आरोप आहे.
राजेश शेटकर यांना मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये बोलावून धमकावल्याप्रकरणी विकास गोगावले यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी न दिल्यास तक्रारदार राजेश शेटकर यांच्या वाहनांची तोडफोड करण्याची विकास गोगावलेंनी धमकी दिली होती.
कोण आहेत भरत गोगावले?
रायगडमध्ये ‘भरतशेठ’ नावाने सर्वपरिचित असलेले शिवसेना आमदार भरत गोगावले हे सेनेचे धडाडीचे नेते मानले जातात. 2009 आणि 2014 अशा सलगा दोनवेळा ते महाड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या मुख्य नेत्यांपैकी एक भरत गोगावले मानले जातात.
राजेश शेटकरांच्या दोन कंटेनरची महाडमध्ये तोडफोड
दुसरीकडे, औद्योगिक वसाहतीमध्ये उभे असलेल्या राजेश कार्गो अँड मुव्हर्स प्र. लि. या ट्रान्सपोर्ट कंपनीचे दोन कंटेनर फोडून चालकांकडील रोख रक्कम आणि मोबाईल लंपास करण्यात आला आहे. या प्रकरणी महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात दहा ते बारा अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल रात्री अॅक्वाफार्मा या कंपनीतून न्हावा शेवा बंदराकडे जात असताना दहा ते बारा अज्ञात इसमांनी बिरवाडी टाकीकोंड या ठिकाणी हे कंटेनर थांबवून त्यांच्यावर हल्ला केला. या दोन्ही कंटेनरच्या काचा फोडल्या. एका कंटेनरचा चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली तर दुसरा कंटेनरचालकाकडील साडेचार हजार रुपयांची रोख रक्कम आणि अडीच हजार रुपये किंमतीचा मोबाईल या हल्लेखोरांनी लंपास केला. या प्रकरणी महाड औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात दरोडा, मारहाण आणि नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.