बिटकॉईनमध्ये गमावले 10 लाख; रचला चोरीचा बनाव, ‘असा’ झाला भांडाफोड
कमी वेळेत जास्त पैसे कामविण्याची लालसा काही क्षणात उद्ध्वस्त करते. अशीच एक घटना वसईमधून समोर आली आहे.
पालघर: कमी वेळेत जास्त पैसे कामविण्याची लालसा काही क्षणात उद्ध्वस्त करते. अशीच एक घटना वसईमधून समोर आली आहे. मुलीच्या लग्नासाठी बचत केलेले दहा लाख रुपये एका व्यापाऱ्याने बिटकॉईनमध्ये गुंतवले होते. मात्र त्यामध्ये त्याला तोटा झाला. आता बायकोला काय उत्तर द्यायचे या विवंचनेतून त्यांने दहा लाखांच्या चोरीचा बनाव रचला. याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर वसई पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये व्यापाऱ्याचा भांडाफोड केला. सदरील प्रकार स्टेशन डायरीमध्ये नोंद करून, त्याला समज देऊन सोडून देण्यात आले. सुभंत यशवंत लिंगायत असे व्यापाऱ्याचे नाव आहे.
चोरीचा बनाव
वसईच्या पापडी येथील साई सर्व्हिस सेंटरसमोर 10 लाखाची रोकड घेऊन चोरट्याने पोबारा केल्याची तक्रार लिंगायत यांनी वसई पोलीस ठाण्यात केली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. मात्र ही चोरी नसून, व्यापाऱ्याने चोरीचा बनाव केल्याचे पोलीस तपासात समोर आले. 8 डिसेंबर रोजी सुभंत लिंगायत यांच्या मुलीच लग्न आहे. आणि त्यासाठी त्यांनी दहा लाख रुपये जमा केले होते. माञ अधिक पैशासाठी त्याने हे दहा लाख बिटकॉईनमध्ये गुतंवणूक केले. बिटकॉईनमध्ये मोठ्या प्रमाणात तोटा झाल्याने, घरी बायकोला काय सांगायचे याच विचाराने त्याने आपली दहा लाखाची रोकड चोरटयाने चोरुन नेल्याचा बनाव केल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘असा’ झाला व्यापाऱ्याचा भांडाफोड
लिंगायत हे विरारमधील होलसेल व्यापारी आहे. सुभंत यांनी बिटकॉईनमध्ये पैसे गमावल्यानंतर चोरीचा बनाव रचला. त्यांनी पोलिसांना सांगितले की माझ्याकडे दहा लाखांची रोकड होती. मला गाडी घ्यायची असल्याने सव्वा लाख रुपये शोरूममध्ये जमा करायचे होते. तर अन्य काही व्यापाऱ्यांना देखील पैसे द्यायचे होते. मात्र त्याचवेळी दुचाकीवर आलेल्या एकाने आपल्या हातातील बॅग हिसकून पोबारा केला. मात्र पोलिसांना घटनास्थळी कोणतेच पुरावे न सापडल्याने संशय आला. त्यांनी तक्रारदार व्यापाऱ्याची कसून चौकशी केली असता, व्यापाऱ्याचे चोरीच्या बनावाची कबुली दिली.
संबंधित बातम्या
Pune Crime |लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झाल्याने स्वीकारला दुचाकीचोरीचा मार्ग ; 13 दुचाकीसह वाहन चोर अटकेत
शिवसेना आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न, राजस्थानमधून आरोपीला अटक
VIDEO | हिरे दागिन्यांच्या दुकानात नऊ जण शिरले, हातोड्याने काचा फोडून दरोडा