नाशिकमध्ये मुलीचा सासरवाडीला जाण्यास नकार, आईचा पोलीस स्टेशनबाहेर आत्महत्येचा प्रयत्न
मुलगी सासरी जात नसल्याच्या रागातून नाशिकच्या एका महिलेने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.
नाशिक : मुलगी सासरी जात नसल्याच्या रागातून नाशिकच्या एका महिलेने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. नाशिकच्या पंचवटी पोलीस स्टेशनबाहेर ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर या महिलेला उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं (Female suicide attempt over family dispute).
काय आहे प्रकरण?
आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव हरजिंदर संधू असं आहे. त्यांच्या मुलीचं गेल्या महिन्यात (जानेवारी 2019) लग्न झालं होतं. मात्र, लग्नानंतर मुलीचं पतीसोबत भांडण झालं. त्यामुळे मुलगी वेगळी राहत होती. हरजिंदर संधू यांनी आपल्या मुलीला समजवण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या मुलीने पतीसोबत राहण्यास नकार दिला.
मुलगी ऐकत नसल्याने अखेर हरजिंदर संधू यांनी आपल्या पतीसह पंचवटी पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांच्या मध्यस्तीने मुलगी आपलं ऐकेल या आशेने त्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्या. मात्र, तरीही मुलीने सासरी जाण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे अखेर हरजिंदर यांनी पोलीस स्टेशनबाहेर स्वत:ला पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी पंचवटी पोलीस पुढीत तपास करत असून कौटुंबिक कलहातून महिलेने आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे.
Female suicide attempt over family dispute