महापालिकेच्या फटाके स्टॉल लिलावाचा बार फुसका; नाशिकमध्ये विक्रेत्यांचे खासगी ठिकाणांना प्राधान्य
नाशिक महापालिकेच्या स्टॉल लिलावाकडे शहरातील फटाके विक्रेत्यांनी अक्षरशः पाठ फिरवली आहे. त्यामुळे तीनशेपैकी जवळपास 188 स्टॉल रिकामे राहिले आहेत.
नाशिकः नाशिक महापालिकेच्या स्टॉल लिलावाकडे शहरातील फटाके विक्रेत्यांनी अक्षरशः पाठ फिरवली आहे. त्यामुळे तीनशेपैकी जवळपास 188 स्टॉल रिकामे राहिले आहेत.
खरे तर नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून फटाके विक्री चर्चेत आहे. कारण राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ योजनेअंतर्गत वायू प्रदूषण रोखण्यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुढाकार घेऊन नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात दिवाळीत फटाके विक्री करण्यावर बंदी घातली होती. विशेष सभा घेऊन फटाके बंदीबाबत आपआपल्या विभागांना तात्काळ निर्णय घेण्याचे आदेशही गमे यांनी दिले होते. ऐन दिवाळीच्या तोंडावर हा निर्णय झाल्याने फटाके विक्रेते नाराज झाले होते. शेवटी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे फटाके विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यानंतर महापालिकेने तातडीने फटाक्यांच्या 299 स्टॉलसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. मात्र, आता पोलिसांनी शहरातील खासगी ठिकाणी स्टॉल्स उभारायला परवानगी दिली आहे. त्याचा परिणाम या लिलावावर झालेला दिसला. त्यामुळे तब्बल 188 स्टॉल रिकामे राहिले असून, महापालिकेचा मोठा महसूल बुडाला आहे. आता शिल्लक राहिलेल्या गाळ्यांसाठी लिलाव न करता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
गेल्यावर्षी होती बंदी
दरम्यान, नाशिकमध्ये गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर 2020च्या मध्यरात्रीपासून फटाके फोडण्यात बंदी घालण्यात आली होती. फटाके फोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता. राज्यातील कोरोनाचं संकट अद्यापही गेलेले नाही. त्यातच थंडी वाढल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची चिन्हे आहेत. शिवाय दिवाळीत फटाके फोडल्यास कोरोनाचा संसर्ग आणि वाढण्याची शक्यता असल्याचं सांगत ही फटाके बंदी घालण्यात आली होती.
प्रदूषण वाढण्याची भीती
कोरोनामुळे गेल्यावर्षी नाशिकमध्ये फटाके फोडण्यावर बंदी होती. अपवाद वगळता नाशिककरांनी या बंदीचे पालन केले. त्यामुळे कललेही प्रदूषण झाले नाही. आता या वर्षी मात्र दिवाळी दरम्यान शहरवासीय मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्याची शक्यता आहे. त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. प्रदूषणात वाढ भयंकर वाढण्याची भीती आहे. हे पाहता नागरिकांनी सजग होत प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा विडा उचलावा, असे आवाहन शहरातील पर्यावरण प्रेमींनी केले आहे.
इतर बातम्याः
गोदाकाठच्या 100 मीटर परिसरात नो प्लास्टिक झोन; नाशिक महापालिकेचा निर्णय
कार्यालयात हेल्मेटशिवाय प्रवेश नाही; नाशिकमध्ये पोलीस आयुक्तांची अनोखी मोहीम
चर्चा तर होणारचः शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते संजय राऊत उद्यापासून नाशिक दौऱ्यावर
गोदाकाठच्या 100 मीटर परिसरात नो प्लास्टिक झोन; नाशिक महापालिकेचा निर्णयhttps://t.co/e2kGSJpbsk#Nashik|#GodavariRiver|#NoPlasticZoneNashik|#NashikMunicipalCorporation
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 22, 2021